परात्पर गुरु डॉ. आठवले आई-वडिलांच्या करत असलेल्या सेवा !
परात्पर गुरु डॉ. आठवले आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !
स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘वर्ष १९९० पासून सनातन संस्थेचे कार्य मुंबई येथे चालू झाले. तेव्हापासून आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या घरी सेवेनिमित्त जाऊ-येऊ लागलो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे आई-वडील त्यांच्याकडे रहात होते. आम्ही सर्व साधक त्यांना प.पू. डॉक्टर संबोधायचे त्याप्रमाणे ‘ताई’ आणि ‘दादा’ असे संबोधत होतो. सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काही जण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रती किती हा कृतघ्नपणा ? ‘अशा समाजाला योग्य दृष्टीकोन मिळावा’, यासाठी प्रत्यक्ष भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी) त्याच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, हे येथे दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल.
‘सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड देऊन आध्यात्मिक स्तरावर सेवा कशी करायची ?’, हे प.पू. डॉ. आठवले यांनी केलेल्या त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेतून शिकायला मिळते. १४.११.२०२१ या दिवशी आपण ‘अध्यात्मप्रसाराच्या दौर्यावर जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आई-वडिलांच्या सेवेची केलेली परिपूर्ण सिद्धता !’ हा भाग पाहिला. आज आपण या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया.
(भाग ५ वा)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/527070.html
१३. आई-वडिलांना ठिकठिकाणी घेऊन जाणे
१३ अ. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांना संतांचे दर्शन अथवा त्यांचे कार्यक्रम यांसाठी घेऊन जाणे : ‘प.पू. डॉक्टर ज्या इमारतीमधे रहायचे, तेथे अन्य संप्रदायांनुसार साधना करणारे लोकही रहायचे. त्यांच्या घरी त्यांचे गुरु किंवा संत आल्यास प.पू. डॉक्टर ‘पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांना संतांच्या दर्शनाचा लाभ व्हावा’, यासाठी त्यांना संतांच्या दर्शनासाठी घेऊन जायचे. प.पू भक्तराज महाराज यांच्या कार्यक्रमाचे किंवा सनातनच्या सार्वजनिक सभेचे स्थळ घरापासून जवळ असल्यास तेथेही ते त्यांना घेऊन जायचे.
१३ आ. सद्गुरु डॉ. अप्पाकाका ((कै.) सद्गुरु डॉ. वसंत आठवले) यांच्याकडे प्रतिवर्षी श्री गणेशचतुर्थीला घेऊन जाणे : प.पू. डॉक्टरांचे सर्व नातेवाईक नोकरी आणि व्यवसाय यांमधे व्यस्त असल्यामुळे ते ‘एकमेकांना एकत्र येऊन भेटले’, असे अत्यल्प वेळा व्हायचे. प्रत्येक वर्षी श्री गणेशचतुर्थीला प.पू. डॉक्टरांचे मोठे भाऊ सद्गुरु अप्पाकाका ((कै.) सद्गुरु डॉ. वसंत आठवले) यांच्या घरी दीड दिवसाचा गणपति बसवत असत. त्या निमित्ताने त्यांच्याकडे सर्व नातेवाईक एकत्र जमत. अशा वेळी ‘पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांना सगळ्यांना भेटता यावे’, यासाठी प.पू. डॉक्टर त्यांना सद्गुरु अप्पाकाकांकडे घेऊन जायचे. त्यामुळे त्यांनाही सर्व नातेवाइकांना भेटल्याचा आनंद मिळायचा. प.पू. डॉक्टर श्री गणेशचतुर्थीच्या काळात दौर्यावर असल्यास ते सेवाकेंद्रात रहाणार्या साधकांना प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांना सद्गुरु अप्पाकाकांकडे घेऊन जाण्यास सांगायचे.
१३ इ. ‘आई-वडिलांना ‘दैनंदिन जीवनात थोडा पालट व्हावा’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी त्यांना प्रत्येक ३ – ४ मासांनी अलीबाग येथील कोर्लई गावातील समुद्रकिनार्यावर असलेल्या विलासकाकांच्या बंगल्यात रहायला घेऊन जाणे : पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा कुठेही बाहेर जायचे नाहीत. त्यांना ‘दैनंदिन जीवनाचा कंटाळा येऊ नये’, यासाठी प.पू. डॉक्टर अलीबाग जिल्ह्यातील कोर्लई गावात समुद्रकिनार्यावर असलेल्या विलासकाकांच्या बंगल्यात त्यांना रहायला घेऊन जायचे आणि स्वतःही ३ – ४ दिवस त्यांच्यासमवेत राहून त्यांची काळजी घ्यायचे. कोर्लई गावात रुग्णालय नसल्यामुळे प.पू. डॉक्टर पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांच्यासाठी लागणार्या ‘ऑक्सिजन सिलिंडर’ पासून ‘त्यांना नियमित लागणारी सर्व औषधे, इंजेक्शने इत्यादी सर्व गोष्टींची सूची करून त्याप्रमाणे सर्व सिद्धता स्वतः करायचे आणि ते सर्व साहित्य समवेत घेऊन जायचे. हे सर्व करत असतांना त्यांची ग्रंथ लिखाणाची सेवाही चालूच असे.
काही वेळेस प.पू. डॉक्टर प.पू. दादांना ग्रंथातील व्याकरण पडताळण्यासाठी द्यायचे. प.पू. दादा ती सेवाही आनंदाने करायचे.
१४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आई-वडिलांची सेवा संतांची सेवाच आहे’, असा भाव ठेवून करणे आणि साधकांनाही तसाच भाव ठेवण्यास सांगणे
प.पू. भक्तराज महाराज नेहमी म्हणायचे, ‘‘दादांचा अधिकार मोठा आहे.’’ ते मुंबईत प.पू. डॉक्टरांकडे वास्तव्यासाठी यायचे, तेव्हा पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा त्यांच्या दर्शनाला आवर्जून बाहेर येऊन बसायचे. प.पू. भक्तराज महाराज प.पू. दादांना स्वतःच्या शेजारी बसवून घ्यायचे. कधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प.पू. दादांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या दर्शनाला यायला जमले नाही, तर प.पू. भक्तराज महाराज स्वतःच प.पू. दादांना भेटायला त्यांच्या खोलीत जायचे आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. सेवाकेंद्रात जेवढे संत यायचे, ते पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांना आवर्जून भेटायचे. प.पू. डॉक्टरही ‘प.पू. दादा संत आहेत’ असा भाव ठेवूनच त्यांची सेवा करायचे आणि आम्हालाही तोच भाव ठेवून सेवा करायला सांगायचे.
१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. दादांनी केलेले लिखाण आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कविता यांच्या हस्तलिखितांचे जतन करून ते संग्रही ठेवणे आणि त्यांचे ग्रंथरूपात प्रकाशनही करणे
प.पू. दादा शाळेत शिक्षक होते. तेव्हापासूनच ते विविध विषयांवर लिखाण करायचे. एखाद्याच्या नावावरून ते सुंदर कविताही करायचे. त्या कवितांचे वैशिष्ट्य असे की, ‘कवितेच्या प्रत्येक ओळीच्या आरंभीचा शब्द आणि त्याच ओळीचा शेवटचा शब्द, असे पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीतील प्रत्येक शब्द मिळून त्या साधकाचे नाव सिद्ध व्हायचे किंवा त्या साधकाचे त्यामधे आध्यात्मिक वैशिष्ट्य विशद केलेले असायचे. प.पू. दादांनी केलेल्या सर्व कविता आणि सर्व लिखाण हे आध्यात्मिक स्तरावरचे असायचे. प.पू. डॉक्टरांनी याविषयीची त्यांची सर्व हस्तलिखिते व्यवस्थित जतन करून संग्रही ठेवली होती. त्यांनी त्या सर्व लिखाणाचे ४ ग्रंथरूपात (सुगम सात्त्विक जीवन, सुगम भक्तीयोग, सुगम अध्यात्म आणि नावांवरून होणार्या कविता) प्रकाशनही केले आहे.
१६. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांनी वापरलेले सर्व साहित्य जतन करून ठेवणे
प.पू. दादा हे संतच होते आणि पू. ताई यांची आध्यात्मिक पातळीही चांगली होती. (वर्ष २००२ मध्ये प.पू. डॉक्टरांनी ‘पू. ताईंची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे’, असे सांगितले होते.) सर्वसामान्यत: समाजात एखाद्या व्यक्तीचे आई-वडील गेल्यावर त्यांची मुले काय पहातात, तर ‘त्यांची संपत्ती किती आहे ? त्यांच्या नावावर काय काय आहे ?’ इत्यादी. पू. ताई आणि प.पू. दादा यांनी देहत्याग केल्यावर दुसर्याच दिवशी प.पू. डॉक्टरांनी त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तू जतन करण्याच्या दृष्टीने व्यवस्थित बांधून त्यावर सर्व माहिती लिहून आश्रमात पाठवून दिल्या. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘पुढे सनातन संस्थेचे संग्रहालय होईल. त्यामधे संतांच्या वस्तूंचे प्रदर्शन असेल. तेथे या वस्तू ठेवता येतील आणि पुढच्या पिढीतील साधकांना त्याचा लाभ होईल.’’ यावरून ‘प.पू. डॉक्टर प्रत्येक क्षणी समष्टीचा किती विचार करत होते ?’, हे लक्षात येते.
१७. भावनेत न अडकता प्रसारसेवेसाठी प.पू. डॉक्टर गोव्यात रहायला जाणे आणि मुंबईत आल्यावर ‘पू. ताईंना एकटे वाटू नये’, यासाठी किंवा त्या रुग्णाईत असल्यास त्यांच्या खोलीत झोपायला जाणे
प.पू. डॉक्टर वर्ष १९९९ पासून प्रसारकार्याच्या दृष्टीने मुंबई सोडून गोव्यात स्थायिक झाले. आपण गोव्याला गेल्यावर ‘पू. ताईंचे कसे होईल ?’, असा भावनिक विचार न करता प.पू. डॉक्टरांनी पू. ताईंची सेवा करण्यासाठी साधक सिद्ध केले आणि पू. ताईंना सांगितले, ‘‘प्रसारकार्यासाठी मी गोव्याला जाणार आहे. इकडे अप्पा, विलास, सुहास आहेत आणि साधकही आहेत. मी प्रत्येक आठवड्याला भ्रमणभाष करीन. मधे-मधे मी मुंबईला येईन, त्या वेळी भेट होईलच.’’ पू. ताईंनीही त्यांना तसे करण्यासाठी अनुमोदन दिले आणि ‘‘इकडे माझे करणारे साधक आहेत. तुम्ही आनंदाने जा’’, असे त्यांना सांगितले. प.पू. डॉक्टर जेव्हा मुंबईत यायचे, तेव्हा जितके दिवस ते मुंबईत रहायचे, तितके दिवस ते रात्री पू. ताईंच्या खोलीत झोपायचे आणि दिवसभर तिथेच खोलीत बसून ग्रंथाची सेवा करायचे.
१८. कृतज्ञता
पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा केल्यावर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला दर्शन देणासाठी आतुर झालेल्या भगवंताविषयी आपण ऐकले आहे; परंतु त्याच भगवंताने प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून ‘आई-वडिलांची सेवा कशी करायची ?’, हे आम्हाला स्वतःच्या कृतीतून शिकवले. यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. मातृ-पितृऋणातून मुक्त होण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला कृतीतून केले. आम्हाला त्यांच्यातील सहजभाव, प्रीती, परिपूर्णता आणि समष्टीचा विचार करणे, हे दैवी गुण पहायला अन् शिकायलाही मिळाले. यासाठी भगवंतस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोमल चरणी आम्ही साधक कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मातृ-पितृ ऋणांतून मुक्त होण्यासाठी साधकांना केलेले मार्गदर्शन !१. ‘आईची सेवा भावपूर्ण केल्यास प्रगती होईल’, असे एका साधकाला सांगणे ‘एक साधक ४ – ५ वर्षे त्याच्या वृद्ध आईची सेवा करत होता. ‘मी आईची सेवा करतो; पण यातून माझी साधना होते कि नाही ?’, असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. त्याने तो विचार प.पू. डॉक्टरांना सांगितला. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी त्याला सांगितले ‘पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. मीसुद्धा अनेक वर्षे माझ्या आई-वडिलांची सेवा केली आहे. तू आईची सेवा भावपूर्ण केल्यास त्यातूनच तुझी साधना होईल.’’ त्यानंतर त्या साधकाने भावपूर्णपणे आईची सेवा केली आणि त्या सेवेतूनच त्याची आध्यात्मिक प्रगतीही झाली. २. साधक पूर्णवेळ साधना करत असतांना घरी जाऊन आई-वडिलांची सेवा करू न शकणार्या साधकांनी ‘मातृ-पितृ ऋणांतून कसे मुक्त व्हायचे ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन प.पू. डॉक्टरांना त्यांच्या आई-वडिलांची सेवा करतांना पाहिल्यावर एका साधकाच्या मनात विचार आला, ‘प.पू. डॉक्टर पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांची सेवा करून मातृ-पितृ ऋणातून मुक्त होत आहेत. मी पूर्णवेळ साधक आहे. मी घरी जातही नाही आणि आई-वडिलांची सेवाही करत नाही, तर मी मातृ-पितृ ऋणातून मुक्त कसा होणार ?’ हा विचार त्याने प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘पूर्ण वेळ साधना करणार्या साधकाने आश्रमातील वयस्कर आणि रुग्णाईत साधक अन् संत यांची भावपूर्ण आणि प्रेमपूर्वक सेवा केल्यावर तो मातृ-पितृ ऋणातून मुक्त झाल्यासारखेच आहे. त्यामुळे त्याची काळजी साधकांनी करायला नको.’’ – श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०) |