‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या वतीने कोल्हापुरात प्रथमच ‘ॐ महामंत्र का उच्चारण’ या कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – आज तरुणांमध्ये रक्तदाब, हृदयरोग यांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी ‘ॐ’चे उच्चारण लाभदायक ठरते. याचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील ‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या वतीने दसरा चौक येथील शाहू स्मारक येथे २३ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आणि २४ नोव्हेंबर या दिवशी गांधीनगर येथील ‘सेंट्रल पंचायत हॉल’ येथे दुपारी ४.३० ते रात्री ७ या वेळेत ‘ॐ महामंत्र का उच्चारण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून ‘त्याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन ‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या साधकांनी १८ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर येथील ‘प्रेस क्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात माहिती देतांना संस्थेच्या संचालिका अंजना पवार म्हणाल्या, ‘‘संस्थेच्या मुख्य संचालिका देवकी मैया यांनी ईश्वराच्या प्रेरणेने ‘ॐ’ उच्चारण्याची चळवळ चालू केली. ‘ओम मंडली शिवशक्ती सेवा संस्थे’च्या वतीने संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी याचा प्रसार करण्यात येत आहे. लहान मुलांवर लहान वयात ‘ॐ’च्या उच्चारणाचे संस्कार झाले, तर पुढे हीच पिढी सकारात्मक आणि संस्कारक्षम बनेल. यांसाठी विविध शाळांमध्ये ‘ॐ’ या ध्वनी उच्चारणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत.भारतातील प्रत्येक व्यक्तीने याचा अवलंब केला, तर राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि विज्ञानसत्ता यांना एकत्रित करून भारत विश्वगुरु बनू शकेल.’’
या वेळी नरेश चोइथानी, विठ्ठल चोपदार, तुमेश्वर साहू, हरीश कंजनी, जय सुंदरानी आदी उपस्थित होते.