लाच प्रकरणात सैन्यातील २ अधिकार्यांना अटक !
सैन्यातील अधिकारीही भ्रष्टाचार करत असतील तर देशाचे भवितव्य सुरक्षित कसे राहू शकेल ? – संपादक
पुणे – लवकर सेवेत रुजू करण्याच्या बहाण्याने एम्.टी.एस्. पदासाठी (मल्टी टास्किंग असिस्टन्स) निवड झालेल्या उमेदवाराकडून अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ३० सहस्र रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सैन्यातील २ अधिकार्यांना १७ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. पुण्यातील सदर्न कमांडमधील या दोन अधिकार्यांविरुद्ध तक्रार नोंद झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सीबीआयने आरोपींच्या घराची झडती घेतली असून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांनी दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वीही स्थानांतराचा अर्ज पुढे पाठवण्यासाठी कर्मचार्यांकडून ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना हवाईदलाच्या राजपत्रित अधिकार्याला १५ नोव्हेंबर या दिवशी अटक करण्यात आली होती. भारतीय सैन्य भ्रष्टाचाराविषयी कडक धोरण अवलंबत आहे.