सातारा येथील लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत सातारा पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ !
अनेक गुंडांना अटक
सातारा, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील सदरबझार परिसरामध्ये १७ नोव्हेंबर या दिवशी एका मद्य व्यावसायिकाने ३ जणांना मारहाण केली होती. या वेळी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. यामुळे सातारा येथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री लक्ष्मी टेकडी परिसरामध्ये मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले. त्यात ६० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी तेथील अनेक गुंडांना अटक करण्यात आली. अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय करणार्यांवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. लक्ष्मी टेकडी परिसरामध्ये झोपडपट्टीतील गुंडांची दहशत वाढली असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कह्यात घेतलेल्या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.