तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पावित्र्यासह पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक !
‘‘भारतातील ऋषीमुनींनी ४ धाम, ४ कुंभस्थळे, १२ ज्योतिर्लिंगे, ७ मोक्षदायी नगरी (पुरी), ७ पवित्र नद्या इत्यादींच्या यात्रांना ‘मोक्षदायक’ म्हटले आहे. ऋषींनी असे सांगण्यामागे पुढील दोन उद्देश आहेत.
एक म्हणजे भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेला दृढ करणे आणि दुसरा म्हणजे संन्यासी अन् वानप्रस्थाश्रमी यांची प्रज्ञा (बुद्धी) अधिक प्रगल्भ करून त्यांची साधना वाढवणे, ज्यामुळे ते आपल्या समाजरूपी ईश्वराची पूजा अधिक दक्षतेने करू शकतील. वेदातील खालील मंत्र याकडे संकेत करतो.
उपहृरे गिरीणां सङ्गमे च नदीनाम् ।
धिया विप्रो अजायत ।। – सामवेद, मंत्र १४३
अर्थ : पर्वतांच्या गुफांमध्ये आणि नद्यांच्या संगमावर साधना केल्यामुळे मानवाची विशेष बुद्धी मेधावी बनते.
याचे अनुमोदन मनु महाराजांनीसुद्धा (२ः१०४) केले आहे. -‘अपां समीपे नियतो नैत्यिकं विधिमास्थि:’ म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि मनाची शांती यांसाठी सुरम्य, आरोग्यप्रद, प्रदूषणरहित आणि एकांतमय वातावरणात ध्यानादी साधना केल्याने मनुष्यांना प्रज्ञा बुद्धी प्राप्त होते. मनुष्य त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक दोषांपासून मुक्त होऊन श्रेयमार्गाचा पांथस्थ बनतो. त्यामुळे अशा स्थानांना ‘तीर्थम् (तारयति इति तीर्थम्)’ म्हटले गेले.
अशी पावित्र्य, नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्य यांनी परिपूर्ण असलेली ही श्रद्धास्थाने भाविकांना धर्मशिक्षण नसल्याने दुर्दैवाने प्लास्टिकच्या कचरापात्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. तसेच तेथील प्रदूषणाची स्थितीही गंभीर होत आहे. या लेखात तीर्थक्षेत्रांची असलेली स्थिती आणि त्यावर कृतीत आणावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा ऊहापोह केला आहे.
१. तीर्थस्थानी प्रेक्षक म्हणून येणार्या यात्रेकरूंमुळे वाढत असलेले प्रदूषण आणि होत असलेले अपघात
काही तीर्थस्थानी धर्मात्म्यांनी मंदिरे आणि धर्मशाळा उभारल्या; जणेकरून तेथे जाणार्या साधकांना तीव्र शीतलता (थंडी), वर्षा (पाऊस) आदी वेगांपासून वाचवले जावे. त्यानंतर हळूहळू ही तीर्थस्थाने सुंदर मंदिरे, भवने इत्यादींनी अलंकृत केली जाऊ लागली आणि तेथे येणारे बहुतांश लोक केवळ प्रेक्षक म्हणून येऊ लागले. या प्रकारे तीर्थक्षेत्री जाण्याचा मूळ हेतूच नष्ट होत आहे; पण तरीही यात्रेकरूंच्या मनात या स्थानांविषयी पूर्ण श्रद्धा राहिली. पूर्वी या स्थानांवर घाण करणे, हे पाप मानले जात होते. गंगेच्या पवित्र जलामध्ये कुणी चूळही भरत नव्हते. तीर्थस्थानी रहदारी वाढल्यामुळे मग वाहनांचा वापर होऊ लागला.
या वाहनांमुळे एका बाजूने प्रदूषण वाढू लागले आणि दुसर्या बाजूला वाहनांची सोय झाल्यामुळे तेथे लोकांचे लोंढे येऊ लागले. तेथील नैसर्गिक दृश्य दगड काँक्रिटच्या भवनांमुळे अदृश्य झाले आणि मानवी मलमूत्रामुळे तेथील प्रदूषण वाढले. आतातर अशा तीर्थस्थानी येत असलेल्या यात्रेकरूंच्या लोंढ्यामुळे अपघात होऊ लागले आहेत. वैष्णोदेवी मंदिर आणि गोदावरीचा पुष्कर घाट येथे झालेले अपघात ही अशा अपघातांची काही उदाहरणे आहेत.
२. हिमालयावर गेलेल्या गिर्यारोहकांकडून प्लास्टिकचा कचरा टाकला जाणे आणि त्याचे होणारे परिणाम
भारतात पाश्चात्त्यांचे पर्यटन आयात झाल्यामुळे केवळ याचा तीर्थक्षेत्रांवर नव्हे, तर त्या तीर्थक्षेत्रांच्या संपूर्ण भागावरच मोठे संकट आले आहे. काही वर्षांपूर्वी झालेली उत्तराखंडची नैसर्गिक आपत्ती याचे उदाहरण आहे. पूर्वी देवात्मा हिमालयावर अनेक भाविक दंडवत घालत जात होते. भारत, तिबेट, नेपाळ इत्यादींवर असीम उपकार करणार्या हिमालयावर (नेपाळमध्ये) मौजमजा करण्यासाठी गेल्या वर्षी श्रद्धाभावरहित २ लक्ष ३० सहस्र पर्यटक गेले, त्यात निम्मे गिर्यारोहक होते. हिमालयाच्या शिखरावर एक व्यक्ती सरासरी १० किलो कचरा टाकून येते. शिखरावर जाणार्या गिर्यारोहकांमुळे निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा दिवसेंदिवस चक्रवाढ व्याजाच्या दराप्रमाणे वाढतच आहे. हा कचरा लहान नदी-नाल्यांच्या प्रवाहात अडथळे आणतो आणि त्यामुळे तेथील भूमीवरील मातीचा थर खाली दबल्यामुळे वृक्षांचे उत्स्फूर्त अंकुरण बंद होऊ लागले आहे. जर ही स्थिती नियंत्रणात आणली गेली नाही, तर हिमालयाला नग्न (वृक्षविहीन) करण्याचे पाप येणार्या पिढीला भोगावे लागणार आहे.
३. वनांचे संरक्षण करणारे वनांच्या विनाशासाठी कारणीभूत असणे
आज पर्यावरण पर्यटनाच्या नावाखाली (इको टूरिझम) शासकीय धनलोलुपता आणि अधिकार्यांना हॉटेलसह अन्य व्यावसायिकांकडून मिळणारे पापाचे धन यांमुळे मैदानी भागांवरील लहानलहान नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्य यांनी परिपूर्ण असलेली ही श्रद्धास्थाने प्लास्टिकच्या कचरापात्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. पर्यावरण दिन आणि वनमहोत्सव साजरा करण्यासाठी अन् पिठात मिठाप्रमाणे वृक्षारोपण करण्याच्या तुलनेत धनार्जनासाठीची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्यासाठी अवैध पद्धतीने होणारी वनतोड आणि उत्खनन यांमुळे होणारी हानी कितीतरी पटींनी अधिक आहे. वन विभागामध्ये अधिकार्यांची संख्या सामान्य वनरक्षकांच्या तुलनेत अधिक आहे. वन विभाग आणि खणीकर्म विभागाचे अधिकारी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या तुलनेत धनार्जनासाठी अधिक महत्त्वाकांक्षी आहेत. ‘वनांचे संरक्षण करणारेच वनांच्या विनाशासाठी कारणीभूत आहेत’, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सध्याच्या काळात पर्यटन रोखणे शक्य नसले, तरीही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काही कठोर उपाय वेळोवेळी करत रहाणे आवश्यक आहे.
४. प्रदूषणाची स्थिती भयानक होण्यापूर्वीच कृतीत आणावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना
नेपाळ शासनाने माऊंट एव्हरेस्टवर जाणार्या प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरावरून परत येतांना तेथून ६ किलो कचरा आणून आधार शिबिरात जमा करणे अनिवार्य केले आहे. युरोपमधील २०० नगरांमध्ये स्थानिक नागरिकांनी एका दिवसासाठी वाहनांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सायबराबाद (तेलंगाणा) येथील आय.टी. नगरमध्ये आठवड्यातून एक दिवस वाहनांचा वापर पूर्णपणे बंद ठेवण्याविषयी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. नुकतेच काही मासांपूर्वी पूर्व चीनमधील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर शांघायमध्ये श्वास कोंडणार्या अत्याधिक प्रदूषणामुळे शासनाने ३ दिवस वाहनांचा वापर पूर्णपणे बंद करणे अनिवार्य केले.
आमच्या देशात प्रदूषणाची स्थिती भयानक होण्यापूर्वीच केंद्र आणि राज्य शासन यांनी पर्यावरणाच्या संदर्भात पुढील काही विधायक आणि प्रतिबंधात्मक पावले उचलली पाहिजेत.
अ. वन, पर्यावरण, पर्यटन आणि खणीकर्म विभागामध्ये नियुक्त होऊ इच्छिणार्या अधिकार्यांसाठी पदवीचा अभ्यासक्रम अनिवार्य केला पाहिजे. पूर्वी कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पर्यावरण रक्षणासाठीचा अभ्यासक्रम आरंभ केला पाहिजे. या विभागात कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वेळोवेळी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रशिक्षणवर्ग घेतले पाहिजेत.
आ. तीर्थक्षेत्रांविषयी यात्रेकरूंमध्ये श्रद्धाभाव वाढण्यासह पर्यावरणविषयी जागृती वाढावी, यासाठी शिबिरे घेतली गेली पाहिजेत. खासगी वाहनांना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करून तेथे केवळ सार्वजनिक वाहनांना जाण्याचीच अनुमती दिली पाहिजे.
इ. तीर्थ-पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी प्लास्टिक घेऊन जाणे, हा दंडनीय अपराध ठरवला पाहिजे.
ई. तीर्थ-पर्यटन क्षेत्रांना जाणार्यांकडून पर्यावरण संवर्धन शुल्क आकारले जाऊन त्यातून शासनाने वृक्षारोपणासाठीचा सगळा व्यय केला पाहिजे.
उ. गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी तीर्थ-पर्यटनांच्या ठिकाणी एका व्यक्तीने एकदाच गेले पाहिजे, असा नियम केला पाहिजे. तसेच पायी किंवा घोड्यावरून जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
ऊ. सरकारकडून प्रायोजित केल्या जाणार्या तीर्थयात्रा आणि हज यात्रा बंद केल्या पाहिजेत. (याच विषयावर गेली काही वर्षे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह आंदोलन करणे, निवेदन देणे आदींद्वारे प्रयत्नरत आहेत. – संपादक)
ए. डोंगराळ प्रदेश आणि वने या ठिकाणी रासायनिक कचरा निर्माण करणार्या उद्योगांना अनुमती दिली जाऊ नये, तर या भागात उद्याने संवर्धन करणार्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
सध्याच्या काळात पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हे विषय मानवी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
या विषयांना प्राधान्य न दिल्यामुळे एका बाजूला अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी यांचे संकट आधीच आलेले आहे, तर दुसर्या बाजूला आरोग्याच्या योजनांवरील व्यय अत्याधिक वाढला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी तीर्थयात्रेच्या पवित्र भावनेचे पोषण करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’
(संदर्भ : मासिक ‘गीता स्वाध्याय’, ऑगस्ट २०१५)
(विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच ! हिंदु राष्ट्रामध्ये हिंदूंना धर्मशिक्षण दिले जाईल आणि त्यामुळे तीर्थक्षेत्रांचे पावित्र्यही जपले जाईल. याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचे संवर्धनही होईल. – संपादक)