शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अन्नदान !
कोल्हापूर, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेना आणि संयुक्त उत्तरेश्वरपेठ शुक्रवार पेठ रंकाळा विभागाच्या वतीने १७ नोव्हेंबर या दिवशी गरीब, गरजू लोकांना ‘उत्तरेश्वर थाळी’ या उपक्रमाच्या अंतर्गत अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी ‘संजय गांधी निराधार योजने’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील शेवटचा माणूस उपाशी रहाता कामा नये या हेतूने ‘झुणका-भाकर’ योजना शिवशाहीचे सरकार आल्यावर चालू केली होती. तोच वारसा पुढे चालू ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवभोजन’ थाळी योजना चालू केली. कोरोना संसर्गाच्या काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब आणि गरजू उपाशी राहू नये, या हेतूने चालू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे.’’
या प्रसंगी किशोर माने, धनाजी कारंडे, योगेश मांडरेकर, संदीप घाडगे, प्रशांत पवार, अभिजित कदम, सम्राट शिर्के, रोहन गवळी, दादू शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
सांगली येथे शिवसेना विश्रामबाग शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना आदरांजली !
सांगली – सांगली येथे १७ नोव्हेंबर या दिवशी शिवसेना विश्रामबाग शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वहाण्यात आली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे युगपुरुष होते. धगधगत्या हिंदुत्वाचा झरा कायम वहाता ठेवण्याचे काम त्यांनी केले.’’ कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख श्री. नितीन काळे यांनी केले होते. या वेळी नानासाहेब शिंदे, सचिन काळे, गणेश पाटील, प्रसाद रिसवडे, प्रशांत पवार, मंदार फडके, सुरेश वाघमारे, राजू गायकवाड, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राजू पुजारी, सचिन पवार यांसह अन्य उपस्थित होते.