क्रांतीकारकांचा अपमान करणारी काँग्रेस !

संपादकीय

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ‘ब्रिटिशांनी दिलेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होते आणि खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये मिळाले’, या विधानानंतर महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांमधील ‘देशप्रेम’ उफाळून आले. क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे इंग्रजांना स्वातंत्र्य द्यावे लागले, तरी यातील दुसरे विधान बोचल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर थेट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान झाल्याचे’ म्हटले. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता काढल्या, तेव्हा चव्हाण यांना काहीही वेदना झाल्या नव्हत्या. खरे तर स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी प्राण अर्पण करणारे कोणत्या जातीचे अथवा धर्माचे आहेत, जहाल आहेत कि मवाळ ? याचा विचार करणे आणि राजकारणाच्या लाभासाठी त्यांच्याविषयी बोलणे, हे अतिशय क्षुद्रपणाचे लक्षण आहे आणि काँग्रेसने हा क्षुद्रपणा वेळोवेळी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी कंगना यांना याविषयी बोलणे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको’प्रमाणे आहे !

‘दे दी हमे आजादी बिना खड्ग, बिना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल’, हे गीत काँग्रेसने वर्षानुवर्षे जनतेला ऐकवले. ‘स्वातंत्र्य क्रांतीने नव्हे, तर गांधीवादाने मिळाले’, असे सांगणे हा क्रांतीकार्याचा धडधडीत अपमान नव्हता का ? देशासाठी फासावर गेलेले भगतसिंह, तसेच राजगुरु, सुखदेव, हुतात्मा झालेले चंद्रशेखर आझाद आदी शेकडो क्रांतीकारकांचा हा अपमान नाही का ? मोहनदास गांधी यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान त्यांना महत्त्वाचे वाटते, तेवढ्या प्रमाणात देशासाठी हुतात्मा झालेले क्रांतीकारकांचे का वाटत नाही ? त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या तोंडी क्रांतीकारकांच्या अवमानाची भाषाच मुळात शोभत नाही. गांधीवादाची गांधीगिरी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणार्‍यांनी क्रांतीकारकांच्या अवमानाच्या वल्गना करायच्या हा दुतोंडीपणा आहे. लोकमान्य टिळक यांच्या देहत्यागानंतर काँग्रेसचे नेतृत्व गांधींकडे आले. ‘लोकमान्य टिळक यांच्यासारखा महान नेता आपला आहे’, असे खरे तर काँग्रेसला अभिमानाने सांगता आले असते; मात्र केवळ गांधीवाद झाकोळला जाईल, म्हणून  लोकमान्य टिळक यांचे जाज्वल्य विचार काँग्रेसने कधी समाजापर्यंत पोचवलेच नाहीत. अर्थात् थोर पुरुष त्यांच्या कर्तृत्वामुळे अजरामर होतातच; मात्र काँग्रेसचा हा खुजेपणा त्यातून दिसून आला. नेताजी सुभाषचंद्र बोस, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदी थोर नेते काँग्रेसचेच होते. काँग्रेसने या नेत्यांचा राष्ट्रवाद जोपासला असता, तर आज काँग्रेसची ही स्थिती झाली नसती; पण काँग्रेसने देशाला केवळ गांधी अन् नेहरू यांच्या दावणीला बांधले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम दाखवणारे अफझलखानाच्या कोथळ्याचे चित्रही सार्वजनिक ठिकाणी लावण्यावर बंदी घालणार्‍या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची तर स्वातंत्र्यलढा आणि इतिहास यांविषयी बोलण्याची काही पात्रताच नाही !