केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधानता दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले !
इंडिगो एअरलाइन्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डॉ. भागवत कराड यांचे कौतुक !
मुंबई – १५ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे देहलीहून मुंबईला जाणार्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. अचानक कराड यांच्या मागील ‘सीट’वर बसलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. त्यामुळे विमानातील ‘क्रू मेंबर्स’ने उदघोषणा करून ‘ऑन बोर्ड’ कुणी डॉक्टर असेल, तर साहाय्य करावे’, अशी विनंती केली असता केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी त्वरित त्या प्रवाशाजवळ जाऊन त्याच्यावर प्रथमोपचार करत त्याचे प्राण वाचवले.
इंडिगो एअरलाइन्सने डॉ. कराड हे रुग्णाला साहाय्य करत असतांनाचे छायाचित्र ट्वीट करत ‘डॉ. कराड यांनी प्रवाशाला साहाय्य करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली सिद्धता ही प्रेरणादायी आहे’, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनीही इंडिगोचे हे ट्वीट रिट्वीट करत, ‘ते मनाने कायमच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ. कराड यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे’, असे म्हटले.