स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती व्याख्यानाचे आयोजन !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये आज हिंदु स्त्री सुरक्षित नाही. स्त्रियांवर बलात्कारासह अ‍ॅसिड आक्रमण आणि चाकू आक्रमण, तसेच त्यांच्या हत्या होत आहेत.  भारतात ६ वर्षांच्या कोवळ्या मुलींपासून ते ६० वर्षांच्या आजीपर्यंत कोणतीही स्त्री सुरक्षित नाही. ती वासनेची बळी पडत आहे. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात स्त्रियांकडे कुणी वाकड्या नजरेने पहात नव्हते. स्त्रियांवर अन्याय करणार्‍याला ‘चौरंगा’ (दोन्ही हात-पाय तोडून टाकणे) करण्याची शिक्षा मिळायची. धर्मांतर, अर्बन नक्षलवाद आणि लव्ह जिहाद ही भारतीय तरुणींपुढील मुख्य संकटे दूर करण्यासाठी आणि स्वरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे. हिंदु सणांचे विकृतीकरण होत असल्याने लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या गोष्टींना खतपाणी मिळत आहे.

कु. नारायणी शहाणे

धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. पुणे येथे ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती’ व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी उपस्थित स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बळकट होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याचे आवाहन केले. व्याख्यानाचा प्रारंभ आदिशक्तीला प्रार्थना करून आणि शेवट शक्तीस्तवनाने झाला.