दक्षिण मुंबईतील हवा देहलीपेक्षा अधिक विषारी !
मुंबई – देहलीपेक्षा दक्षिण मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. समुद्रावरून वहाणारे वारे, वार्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळे वाढलेले प्रदूषण यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतील हवेवर झाला. १६ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील अनेक भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर आहे. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक २८० पर्यंत पोचला आहे. १५ नोव्हेंबर या दिवशी देहलीतील संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३३१ नोंदवण्यात आला होता, तर मुंबईतील कुलाबा परिसरातील निर्देशांक ३४५ इतका नोंदवण्यात आला आहे. कुलाब्यात ३७० पर्यंत निर्देशांक गेला आहे.
कुलाबा, मलबार हिल परिसर येथे धुके पसरले होते. पुढील २-३ दिवस अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. बांधकामात झालेल्या वाढीमुळे धूलिकण वाहून न जाता भूमीलगत हवेत तरंगतात. त्यामुळे वातावरणातील हवा प्रदूषित होते. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वासाच्या समस्येत वाढ होते.