दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जुना ‘व्हिडिओ’ प्रसारित करणार्‍या सोलापुरातील धर्मांधाला अटक !

सोलापूर – त्रिपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा कोणताही आक्षेपार्ह संदेश, ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमावर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले आहे. कठोर कारवाईची चेतावणी देऊनही शहरातील सलीम शेख (कुमठे) याने मारहाणीचा जुना ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. या प्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली.

मागील २-३ दिवसांपासून पोलीस आयुक्त बैजल यांनी नागरिकांना आवाहन करत, कायदेशीर कारवाईची चेतावणी दिली होती; मात्र तरीही धर्मांधाने जुना ‘व्हिडिओ’ प्रसारित केला. तो व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अशा प्रकारचे जुने ‘व्हिडिओ’ प्रसारित करून दोन धर्मांत तेढ निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जात आहे.