मराठवाडा येथील ‘३०-३०’ नावाच्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंद !
संभाजीनगर – मराठवाडा येथे सर्वांत मोठा घोटाळा समजल्या जाणार्या ‘३०-३०’ घोटाळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष उपाख्य सुनील राठोड याच्या विरोधात पोलिसांनी नोंद केला आहे. हा घोटाळा तब्बल ५०० कोटी रुपयांहून अधिक मोठा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबाद : ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांचं दिवाळं; भामट्यांची समृद्धी https://t.co/tAhkYEpTma #pudharionline
— Pudhari (@pudharionline) November 17, 2021
‘३०-३०’ घोटाळा म्हणजे काय ?
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका तरुणाने वर्ष २०१६ मध्ये ‘देहली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’साठी (DMIC) भूमी गेलेल्या भागात शिरकाव करून संतोष राठोड या तरुणाने शेतकर्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमीषे दाखवली. विशेष म्हणजे बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवले गेले. प्रारंभी शेतकर्यांना मासाला ५ टक्क्यांनी परतावा देत नंतर पुढे प्रतिमासाला २५ टक्क्यांनी परतावा परत द्यायला प्रारंभ केला. यासाठी जवळचे नातेवाईक यांना समवेत घेत ‘३०-३०’ नावाचा गट बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावागावांत फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यांतून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये स्वतःचे विज्ञापन करण्यास राठोड याला यश आले.
पुढे परिसरातील अंदाजे ३० गावांतील शेतकरी स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचे काम त्याने केले. बँकेत मिळणार्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन प्रारंभी स्वतःचे विज्ञापन केल्यानंतर राठोड गेल्या ८ मासांपासून पसार आहे. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणार्या महिलेने बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी राठोड याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.