सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही ! – अभिनेत्री कंगना राणावत
दुसरा गाल पुढे करून स्वातंत्र्य नव्हे, तर भीक मिळत असल्याचे प्रतिपादन !
मुंबई – सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळाला नाही, असे विधान अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘इन्स्टाग्राम पोस्ट’द्वारे केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर मिळाले.’’
(सौजन्य : Zee 24 Taas)
या वेळी कंगना यांनी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी प्रसारित केली. त्यात म्हटले आहे, ‘‘गांधी, जवाहरलाल नेहरू आणि महंमद अली जीना यांनी ‘सुभाषचंद्र बोस भारतात परत आले, तर त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात देण्याची सिद्धता दर्शवली होती. एकतर तुम्ही गांधींचे चाहते आहात किंवा नेताजींचे समर्थक आहात. तुम्ही एकाच वेळी दोन्ही असू शकत नाहीत. तुम्ही निवडा आणि ठरवा.’’
दुसर्या एका ‘पोस्ट’मध्ये कंगना यांनी म्हटले, ‘‘स्वातंत्र्यासाठी लढा देणार्यांना अशा लोकांनी स्वतःच्या मालकांच्या स्वाधीन केले, ज्यांच्यात अन्यायाशी लढण्याचे धैर्य नव्हते किंवा ज्यांचे रक्त कधी उसळले नाही. ते धूर्त आणि सत्तेचे लोभी होते. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आम्हाला शिकवले की, जर तुम्हाला कुणी एका गालावर मारली, तर दुसरा गाल पुढे करा. त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशा प्रकारे कुणाला स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे परमार्थ मिळू शकतो. तुमचा नायक हुशारीने निवडा.’’