मालेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांची रझा अकादमीच्या कार्यालयावर धाड !
|
नाशिक – त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये हिंसाचार करणार्या मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागातील रझा अकादमीच्या मुख्य कार्यालयावर पोलिसांनी १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री धाड टाकून कार्यालयाची पडताळणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. ‘मालेगावात झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता’, असे वृत्त समोर आल्यानंतर पोलिसांनी ही धाड टाकली. मालेगावमध्ये ‘रझा अकादमी’ आणि ‘ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमा’ने ‘बंद’ पुकारून फेरी काढली होती. त्या वेळी हिंसाचार उसळला होता.
मालेगाव येथील नगरसेवक अयाज हलचल याने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप सिद्ध करून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह एकूण ३३ जणांना अटक केली होती. याखेरीज पोलिसांनी १६ नोव्हेंबरला सामाजिक कार्यकर्ता अतिक अहमद याच्यासह आणखी ८ जणांना अटक केली. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता ४१ झाली आहे. अटक केलेल्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी अनेक दुकानांची, तसेच लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी केली. याप्रकरणी फेरीच्या आयोजकांविरुद्ध केवळ गुन्हा नोंद झाला होता. पुढची कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांच्या या भूमिकेवर स्वतः आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आता रझा अकादमीच्या कार्यालयावर धाड टाकून कारवाई करण्यात आली.
VIDEO : रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा, झाडाझडतीत काही पत्रकं, दस्तऐवज जप्त : सचिन पाटील pic.twitter.com/2Eps9haZS7
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2021
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी म्हणाले, ‘‘जप्त केलेल्या कागदपत्रांत काही आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक आहे का ?, याची पडताळणी चालू आहे. किल्ला पोलिसांनी ‘यु ट्यूब’वरील प्रक्षोभक आणि धार्मिक भावना भडकवणारी चित्रफीत प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात अम्मार अन्सारी या तरुणाला अटक केली आहे. हिंसाचाराच्या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यासाठी, तसेच दगडफेक आणि तोडफोडीच्या चित्रफिती पाहून संशयितांची ओळख पटवण्यासाठी ६ पथके नेमण्यात आली आहेत. निश्चिती झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराध व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही. शहरवासियांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.’’
मालेगाव दंगलीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ! – एम्.आय.एम्.चे आमदार मौलाना मुफ्ती यांची मागणी
‘मालेगाव येथील दंगलीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी’, अशी मागणी एम्.आय.एम्. पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली. ते म्हणाले, ‘‘मालेगावमध्ये दंगल घडवून आणण्याचा काही समाजकंटकांचा कट होता; मात्र मालेगावच्या नागरिकांनी तो उधळून लावला आहे. ८ दिवसांपूर्वी नगरसेवक आयाज हलचल याने त्रिपुरातील घटनेविषयी बैठक घेतली होती. त्यात त्याने चिथावणीखोर भाषण केले; मात्र याची पोलिसांनी नोंद घेतली नाही.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत. त्यालाही आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुजोरा दिला आहे.