३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर पडलेला भूप्रदेश भारताचा होता ! – संशोधनाचा निष्कर्ष

(डावीकडून) प्रियदर्शी चौधरी, सुभाजित रॉय, सुभम मुखर्जी आणि सुरजयेंदू भट्टाचार्जी झारखंडमधील संशोधन कार्यादरम्यान

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘पी.एन्.ए.एस्.’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात ‘अनुमाने ३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रवलयांकित पृथ्वीवर भूमीचा पहिला भाग बाहेर पडला तो भारत होता’, अशी माहिती देण्यात आली आहे. हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. ‘त्या काळात समुद्रातून जो भाग सर्वांत आधी बाहेर पडला, तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो’, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सिंहभूम जिल्ह्यात आढळणार्‍या खडकांमध्ये अनुमाने ३ अब्ज २० कोटी वर्षांपूर्वीचे भूगर्भीय संदर्भ मिळतात. त्यामध्ये प्राचीन नदींचे प्रवाह, भरती-ओहोटी आणि किनारपट्टी यांचेही संदर्भ आहेत. त्यावरून असे दिसून येते की, पृथ्वीच्या पाठीवरील हाच परिसर सर्वांत आधी समुद्रातून बाहेर पडला होता.

सिंहभूम प्रदेश जेथे संशोधन केले गेले

१. सिंहभूम जिल्ह्यातील भूमीमध्ये ग्रॅनाईट मोठ्या प्रमाणात असून ते ३ अब्ज ५० कोटी वर्षांपूर्वीचे आहे. पृथ्वीच्या पोटात अनुमाने ३५ ते ४५ किलोमीटर खोल झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लाव्हा बाहेर आला त्यापासून हे ग्रॅनाईट बनलेले आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांतही भूमीचे काही प्राचीन भाग आढळले आहेत; पण या सर्वांमध्ये सिंहभूम जिल्हा सर्वांत अधिक पुरातन असल्याचे आढळले.

दोन संशोधकांनी सिंहभूम भागात अभ्यास केला

(वरील सर्व फोटो सौजन्य : Special Arrangement)

२. मोनाथ विश्‍वविद्यालयातील डॉ. प्रियदर्शी चौधरी यांनी याविषयी सांगितले की, आम्हाला एक असा वालुकाश्म सापडला होता ज्याच्या वयाचा अंदाज आम्ही युरेनियम आणि छोटी खनिजे यांचे विश्‍लेषण करून काढला. तेथे असे अनेक खडक असून ते ३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. हे खडक प्राचीन नद्या, तट आणि उथळ समुद्रामुळे बनलेले होते. त्यावरून आम्ही असा निष्कर्ष काढला की, हा परिसर अनुमाने ३ अब्ज १० कोटी वर्षांपूर्वी समुद्रातून बाहेर आला होता.