गोव्यात बनावट मतदारांची नावे मतदारसूचीत
आतापर्यंत २५ सहस्र बनावट नावे सूचीतून गाळल्याचा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा दावा
पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – मताधिक्य वाढवून निवडून येण्यासाठी परराज्यांतील बनावट मतदारांची नावे मतदारसूचीत समाविष्ट केली जात आहेत. राज्यातील चाळीसही मतदारसंघांत राजकीय नेत्यांनी परराज्यांतील नागरिकांची नावे कोणताही ठोस पुरावा नसतांना घालून घेतलेली आहेत. एका फोंडा मतदारसंघातच अशी १० सहस्र नावे आहे आणि ती अल्पसंख्यांकांची आहेत. (यावरून धर्मांधांचा कशा प्रकारे निवडून येण्यासाठी वापर केला जातो आणि नंतर त्यांनी गुन्हे केल्यावर त्यांना पाठीशी घालणे किंवा त्यांच्यावर कारवाई न करणे, असे प्रकार केले जातात, ते यातून लक्षात येते ! – संपादक) एकेका गोमंतकीय व्यक्तीच्या नावावर ५० ते १०० जणांच्या नावांची नोंद करून ठेवली आहे. गोमंतकीय नसलेले; पण अनधिकृतपणे नोंद केलेल्या नावांची सूची सिद्ध करून ती पुराव्यासह निवडणूक अधिकार्यांना देण्यात आली आहे. यामुळे आता २५ सहस्रांहून अधिक बनावट नावे मतदारसूचीतून गाळण्यात आली आहेत. या मासाच्या अखेरपर्यंत अशा स्वरूपातील किमान १ लक्ष नावे वगळणे अधिकार्यांना भाग पडणार आहे, असा दावा ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आर्.जी.) नेते मनोज परब यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘एका मतदान केंद्रात ८४० पैकी ८०० नावे गोमंतकीय नसलेल्यांची आहेत. त्यांच्याकडे घराचा क्रमांकदेखील नाही. काही राजकीय नेते बुथ पातळीवर निवडणूक अधिकार्यांकडे नावांची सूची सुपुर्द करून त्यांची नावे सूचीत समाविष्ट करत आहेत. बुथ अधिकारी कोणतीही शहानिशा न करता ही नावे सूचीत समाविष्ट करतात. फोंडा, मडगाव, म्हापसा, कुठ्ठाळी, नावेली (दर्वली), सांताक्रूझ (इंदिरानगर), ताळगाव, थिवी, वाळपई आदी मतदारसंघांत धक्कादायक आणि आर्श्चयकारक माहिती मिळाली आहे. थिवी मतदारसंघात ‘लाला की बस्ती’ या नावाची एक वस्ती आहे. वर्ष २०१० मध्ये न्यायालयाने येथील ३२ घरे अनधिकृत ठरवली होती, तर आता त्या ठिकाणी १२० नवीन घरे निर्माण झाली आहेत. ‘लाला’ नावाच्या व्यक्तीचे स्थानिक पंचायतीवर नियंत्रण आहे. या वस्तीत एका पंचसदस्याच्या नावावर १२० मतदारांची नावे आहेत आणि सर्वांचा घर क्रमांक १०० असा आहे. हे कसे शक्य होते ? आम्ही पुढील ८ दिवसांत सर्व मतदारसंघांतील सूचींचा अभ्यास पूर्ण करून निवडणूक आयोगासमोर बनावट नावे सुपुर्द करणार आहोत. एकंदरीत १ लक्ष बनावट नावे सूचीतून बाहेर पडतील, असा आमचा अंदाज आहे.’’