पूर्वप्राथमिक ते इयत्ता ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग २२ नोव्हेंबरपासून चालू होण्याची शक्यता
पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने नियुक्त केलेल्या ‘कोविड कृती दला’ने पूर्वप्राथमिक ते इयत्ता ८ वीपर्यंत नियमित वर्ग सोमवार, २२ नोव्हेंबरपासून चालू करण्याची शिफारस शासनाला केली आहे. ‘कोविड कृती दला’च्या १६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर वैद्यकीय तज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली. मागील आठवड्यात राज्यातील कोरोना व्यवस्थापनावरून तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या वैद्यकीय तज्ञ समितीने पूर्वप्राथमिक ते इयत्ता ८ वीपर्यंत नियमित वर्ग चालू करण्याची शिफारस शासनाला केली होती. या पार्श्वभूमीवर ‘कोविड कृती दला’ने हा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार शाळा चालू करण्यासंबंधीचा आदेश, तसेच कोरोना महामारीशी संबंधित नियमावली शिक्षण खाते लवकरच प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये निरनिराळ्या वेळांमध्ये वर्ग भरवणे, शाळेत सामूहिक सभा न घेणे आणि शाळेच्या संकुलात मुलांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आदींचा समावेश असणार आहे. डॉ. शेखर साळकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्यास नियमित वर्ग त्वरित बंद करण्यात येणार आहेत.’’ शासनाने ३ मासांपूर्वी इयत्ता ९ वीपासूनचे नियमित वर्ग चालू करण्यास अनुमती दिलेली आहे.