इंंग्रजीचे दास भारतीय !
‘इंग्रज गेले; पण सर्व अंगांनी (बाजूंनी) ते आपल्याला एवढे दुबळे करून गेले आहेत की, ते गेल्यावरही आपण आपल्याला सावरू शकलो नाही. खरंच आपण एवढे दुर्बल आहोत का ? जर आपण दुर्बल आहोत, तर आपल्याला जगण्याचा हक्क नाही. ते गेले, त्यांचा झेंडाही गेला; पण त्यांची भाषा मात्र आपण कुरवाळत बसलो आहोत. मराठी धड बोलता आली नाही तरी चालेल, मात्र स्वाक्षरी मी इंग्रजीतूनच करणार. इंग्रजी बोलणारा तो अधिक बुद्धीवान असा (अप)समज झाला आहे.
जगात केवळ १२ देशांत इंग्रजी बोलले जाते. बाकी सर्व ८० प्रगत राष्ट्रांत त्यांची मातृभाषा बोलली जाते. रशिया, फ्रान्स, जपान, कोरीया, जर्मनी आणि चीन या सर्व देशांमध्ये शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. आपल्याकडेच शिक्षण आणि शासकीय कामकाज इंग्रजीतून चालते.
हे कमी आहे; म्हणून आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंग्रज भारतात असेपर्यंत ते आपल्या भाषेचा नीट प्रचार करू शकले नाहीत. ते गेल्यावर मात्र इंग्रजीचा चौपट-सहापट प्रचार झाला !’
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.