विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या स्थळाविषयी शासनात मतभिन्नता !

निर्णयाअभावी प्रशासनाची कुचंबणा

विधीमंडळ

मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी ७ डिसेंबर हा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दिनांक घोषित करण्यात आला; मात्र अधिवेशन मुंबई कि नागपूर येथे घ्यावे ?, याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाची कुचंबणा झाली आहे.

‘अधिवेशनावरील व्यय अल्प व्हावा, यासाठी अधिवेशन मुंबईमध्ये घ्यावे’, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे; मात्र ‘मागील २ वर्षे नागपूर येथे अधिवेशन झाले नसल्यामुळे अधिवेशन नागपूर येथे घ्यावे’, अशी काँग्रेसची भूमिका आहे. नागपूर येथील अधिवेशनासाठी जवळजवळ १ मास आधी मंत्रालयातील प्रशासकीय अधिकार्‍यांना नागपूर येथे जाऊन अधिवेशनाची सिद्धता करावी लागते. अधिवेशनासाठी आवश्यक कागदपत्रे नागपूर येथे नेण्याची सिद्धता करावी लागते. अधिवेशनाला जाण्यासाठी १ मास आधी प्रशासकीय अधिकार्‍यांना रेल्वेचे आरक्षण करावे लागते; मात्र अधिवेशनाचा दिनांक जवळ येऊनही अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. सद्यस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची चर्चा चालू आहे.