डिसेंबरपर्यंत ४ तालुक्यांतील रस्ते खड्डेमुक्त करणार ! – बांधकाम विभागाचे मनसेला आश्वासन
प्रशासकीय अधिकारी कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाची वाट का पहातात ? आधीच नोंद घेऊन रस्ते दुरुस्त का करत नाहीत ? – संपादक
सावंतवाडी – बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्या दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ या ४ तालुक्यांतील रस्ते ३१ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. खराब झालेल्या रस्त्यांविषयी बांधकाम विभागाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्या चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी चव्हाण यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी परब यांनी चव्हाण यांना सांगितले की, तुम्ही जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहात. त्यामुळे तुमचा धाक या ठेकेदारांवर ठेवा. जिल्ह्यात काम करतांना सर्व ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवा. ज्या ठिकाणी ठेकेदार कामात विलंब करत असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा.
रस्त्याच्या कामासाठीचे कारीवडे ग्रामस्थांचे उपोषण मागे
सावंतवाडी-आंबोली मार्गावर कारीवडे येथील गवळणीचा व्हाळ, पेडवेवाडी बसथांबा या परिसरात अपघात होत आहेत. त्यामुळे या परिसरात मार्गावर गतीरोधक, दिशादर्शक फलक लावावेत आणि पांढरेपट्टे काढावेत, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कारीवडे येथील ग्रामस्थांनी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर १५ नोव्हेंबरला आंदोलन केले. या वेळी आमदार दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तसेच कामाविषयी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांना सूचना दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.