(म्हणे) ‘प्राथमिक शिक्षणातील माध्यम निवडण्याची संधी पालकांना देऊ !’ – पी. चिदंबरम्, काँग्रेस
|
पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – गोमंतकियांना गोवा राज्य हे कोळसा वाहतुकीचे प्रमुख केंद्र व्हावे असे वाटत नसेल, तर काँग्रेस येथील कोळसा वाहतूक बंद करेल. गोमंतकियांना मोले येथे प्रस्तावित हुबळी-वास्को रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, बेळगाव-गोवा राष्ट्रीय हमरस्त्याचे रूंदीकरण आणि वीजवाहिनी प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प नको असल्यास काँग्रेस पक्ष हे प्रकल्प रहित करणार आहे. गोमंतकियांना जर त्यांच्या पाल्याचे प्राथमिक शिक्षणातील माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असल्यास काँग्रेस पक्ष ते देण्यास सिद्ध आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले. फोंडा येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पी. चिदंबरम् यांनी ही ग्वाही दिली. (काँग्रेसच्या आतापर्यंतच्या अशा निर्णयामुळेच देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे. जपान, चीन यांसारख्या देशांनी मातृभाषेतून मुलांना शिक्षण देऊन भारताच्या कितीतरी पटींनी विकास केला. भारतीय मात्र इंग्रजाळलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘पाश्चात्त्य तेच चांगले’, असे समजून नैतिकदृष्ट्या रसातळाला गेल्यामुळे भारताची सर्वच क्षेत्रांत हानी झाली ! – संपादक)
गोव्यात डायोसेसन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमातील कॉन्व्हेंट शाळांना प्राथमिक शिक्षणासाठी शासन अनुदान देते. मातृभाषाप्रेमींचा विरोध असूनही काँग्रेसच्या शासन काळापासून इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शिक्षणासाठी चालू झालेले शासकीय अनुदान भाजप शासन काळातही चालू राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नेते पी. चिदंबरम् प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्नावरून ही ग्वाही दिली. पी. चिदंबरम् पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१७ मध्ये गोमंतकियांनी सर्वाधिक आमदार देऊनही आम्ही योग्य निर्णय न घेतल्याने सरकार स्थापन करू शकलो नाही; मात्र ही चूक या वेळी होणार नाही. या वेळी बहुमत दिल्यास ५ मिनिटांत आम्ही सरकार स्थापन करू.’’
गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी आणि मगोप यांच्याकडे युतीसाठी बोलणी ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी
पणजी – काँग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी आणि मगोप यांच्याकडे युतीसाठी बोलणी चालू केली आहे. काही भाजपचे आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला.
दिनेश गुंडू राव पुढे म्हणाले, ‘‘पक्षाने १८ नोव्हेंबरपासून राज्यात महागाईच्या विरोधात जागृती मोहीम चालू केली आहे. या अंतर्गत पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांची एकूण ९ पथके ५ दिवस प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहेत. या वेळी वाढती महागाई आणि भाजप सरकारचे अपयश लोकांसमोर मांडले जाणार आहे.’’