आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोमंतकीय चित्रपटांच्या विशेष विभागाला लागू केलेला निर्बंध हटवला
पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘गोवा मनोरंजन संस्थे’ने २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पणजी येथे होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (‘आंचिम’मधील) गोमंतकीय चित्रपटांच्या विशेष विभागाला लागू केलेला निर्बंध मागे घेतला आहे. पूर्वी ‘गोवा मनोरंजन संस्थे’ने ‘आंचिम’मध्ये गोमंतकीय चित्रपटांच्या ४ हून अधिक प्रवेशिका आल्या, तरच विशेष विभाग असणार’, अशी अट घातली होती. याला विरोध झाल्यानंतर ‘गोवा मनोरंजन संस्थे’ने हा निर्णय घेतला.
‘आंचिम’मध्ये यंदा कोकणी आणि मराठी भाषांतील गोमंतकीय चित्रपटांचा विभाग घोषित करण्यात आला आहे. ‘आंचिम’मध्ये दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभु, दिग्दर्शिका अरुणा राजे, अभिनेता जॉन एडाथट्टिल आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वक्ता म्हणून आमंत्रित केले आहे. वक्ता म्हणून आमंत्रित केलेली समंथा ही पहिली दक्षिण भारतीय अभिनेत्री ठरणार आहे. ‘आंचिम’चा प्रारंभ कालॉस सौरा यांचा स्पॅनिश सिनेमा ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ याने होणार आहे. हा चित्रपट मॅक्सिकन कोरिओग्राफर सरा यांच्यावर आधारित आहे. ‘आंचिम’च्या शुभारंभाचा कार्यक्रम बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात होणार आहे. कला अकादमी, आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस या ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे.