पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील धर्मप्रेमींनी केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !
‘मार्च २०२१ पासून सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या संकल्पामुळे धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ हा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहे. प्रत्येक मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे भवानी क्षेत्र आणि गोवा, म्हणजे परशुराम क्षेत्र येथील धर्मप्रेमींसाठी ‘हरिलीला’ सत्संग असतो. या सत्संगात धर्मप्रेमी मागील १५ दिवसांत त्यांच्याकडून समष्टी साधनेसाठी झालेले प्रयत्न सांगतात. सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांच्या मार्गदर्शनातून त्यांना पुढील १५ दिवसांत करायच्या प्रयत्नांची दिशा मिळते. समष्टी साधना करतांना सर्व जण भगवान श्रीकृष्णाची लीला अनुभवत गुरुदेवांच्या समष्टी रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. या सत्संगातून ते एकमेकांचे प्रयत्न जाणून घेऊन त्यांतून शिकण्याचा प्रयत्नही करतात.
या सत्संगातील सर्व धर्मप्रेमी ‘समष्टी सेवेतील सहभाग वाढवणे आणि नियमित व्यष्टी साधना करणे’ यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. या धर्मप्रेमींनी मे आणि जून २०२१ या मासांत समष्टी स्तरावर केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.
१. ‘बायकॉट फेसबूक’ या ‘ट्विटर ट्रेंड’मध्ये धर्मप्रेमींनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग !
१ अ. ‘फेसबूक’ने हिंदुत्वाचा व्यापक प्रसार करणार्या संघटनांची खाती (पेजेस) बंद केल्याच्या विरोधात सर्व धर्मप्रेमींनी एकत्र येऊन ‘ट्वीट’ करणे : ‘फेसबूक’ने ‘हिंदु जनजागृती समिती’च्या फेसबूक पानावर बंदी घातली आणि त्याच वेळी ‘फेसबूक’वाल्यांनी झाकीर नाईक यांची ‘पेजेस’ चालू ठेवली. झाकीर नाईक यांच्या ‘पेज’वरून आतंकवादाला खतपाणी घातले जाते. हिंदुत्वाचा प्रसार करणार्या संघटनांची खाती बंद केली जातात आणि आतंकवाद पोसणार्या संघटनांची खाती चालू ठेवली जातात. याच्या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन ‘फेसबूक’च्या विरोधात ‘ट्विटर’वर ‘ट्रेंड’ घेतला. २०.६.२०२१ या दिवशी ‘ट्विटर’वर ‘बायकॉट फेसबूक’ या विषयावर घेतलेल्या ‘ट्रेंड’मध्ये पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘ट्विटर’च्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘प्ला कार्ड’ (Pla card) बनवून (आंदोलनाच्या माध्यमातून जागृती होण्यासाठीचे अथवा निषेधाचे लिखाण लिहिलेला कागद बनवून) तो हातात धरून स्वतःचे छायाचित्र काढणे आणि ते सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करणे), ‘ट्रेंड’विषयी जनजागृती करणे, ‘ट्रेंड’चा ‘ऑनलाईन’ प्रसार करणे, अशा अनेक माध्यमांतून धर्मप्रेमी त्यात सहभागी झाले.
२. ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला धर्मप्रेमींच्या संघटित प्रयत्नांतून लाभली ८ सहस्रांहून अधिक उपस्थिती !
२१.६.२०२१ या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील सर्व जिज्ञासूंसाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. मनोज खाडये यांचे ‘तणावमुक्तीसाठी साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची प्रसारसेवा पुणे जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमींनी केली. धर्मप्रेमींनी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संपर्क करून त्यांना व्याख्यानाला जोडण्यासाठी उद्युक्त केले. दळणवळण बंदीपूर्वी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळी संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना काही धर्मप्रेमींनी स्वतःहून पुढाकार घेऊन भ्रमणभाष करून या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाची निमंत्रणे दिली आणि त्या जिज्ञासूंचा ‘ऑनलाईन’ सत्संग ठरवला. धर्मप्रेमींनी परिचितांना व्याख्यानाच्या निमंत्रणाच्या ‘पोस्ट’ पाठवल्या. धर्मप्रेमींनी सर्व सेवा मनापासून केल्या आणि झालेल्या सेवेचा आढावाही दिला. सर्वांच्या संघटित प्रयत्नांतून या व्याख्यानाला ८ सहस्रांहून अधिक जिज्ञासू जोडले होते.
३. २७.६.२०२१ या दिवशी चिंचवड येथील धर्मप्रेमींच्या संपर्कातील जिज्ञासूंसाठी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. धर्मप्रेमींनी या व्याख्यानाचाही प्रसार तळमळीने केला.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोनाच्या विरोधात प्रतिकारशक्ती आणि आत्मबळ वाढवण्यासाठी दिलेला ‘दुर्गा-दत्त- शिव’ हा ध्वनीमुद्रित केलेला नामजप लावण्यासाठी धर्मप्रेमींनी रुग्णालये, औषधांची दुकाने, प्रयोगशाळा (‘लॅब’), मंदिरे इत्यादी ठिकाणी प्रयत्न केले.
५. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत अनेक धर्मप्रेमी महिलांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्ती आणि नातेवाईक यांना संपर्क करून त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण देण्याचे महत्त्व सांगून गुरुपौर्णिमेच्या ‘ऑनलाईन’ सोहळ्याला जोडण्यासाठी प्रयत्न केले.’
(क्रमशः)
– श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१३.७.२०२१)