पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकार्‍यांनी लागू केला जमावबंदी आदेश !

पुणे – अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. हा आदेश १४ नोव्हेंबर पासून ते २० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. डॉ. राजेश देशमुख यांनी सागितले की, त्रिपुरा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रझा अकादमीने १२ नोव्हेंबर या दिवशी पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील काही शहरात जातीय हिंसाचार झालेला आहे. यामध्ये अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनेचा अपलाभ घेऊन पुणे जिल्ह्यामध्ये काही समाजकंटक इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबूक आदी सामामिजक माध्यमांचा वापर करून दोन समाजात किंवा गटातटात तेढ निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून भारतीय दंड संहिता कलम १४४ लागू करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

त्यानुसार खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे –

१. कोणत्याही व्यक्तीने इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबूक इत्यादी प्रसारमाध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी पसरवणे

२. कोणत्याही व्यक्तीने इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबूक इत्यादी समाजिक प्रसारमाध्यमाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/ शेअर करणे अशी कृत्ये केल्यास त्याचे सर्वस्वी दायित्व ‘ग्रुप अ‍ॅडमिन’चे असेल.

३. सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती किंवा अफवा जाणीवपूर्वक प्रसारित करणे

४. ५ आणि ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र, लाठीकाठी बाळगणे

५. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणार्‍या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड लावणे आणि त्या प्रकारच्या घोषणा देणे

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र रहातील. हा आदेश १४ नोव्हेंबर या दिवशी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.