नांदेड पोलिसांकडून ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद !

  • नांदेड येथील हिंसाचार प्रकरण

  • ४ जण कह्यात

नांदेड पोलिस पाहणी करतांना

नांदेड – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद शहरात उमटल्यावर १२ नोव्हेंबर या दिवशी दगडफेक करून मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी वजिराबाद, शिवाजीनगर आणि इतवारा पोलीस ठाण्यात ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेतले आहे. दगडफेकीत इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

शिवाजीनगर भागातील मिठाईचे दुकान आणि एका व्यापार्‍यावर दगडफेक करण्यात आली, तसेच डॉक्टर लेन परिसरात एका रिक्शाची काच फोडण्यात आली. महापालिकेच्या मालकीचे असलेले पथदिवे फोडण्यात आले. यामध्ये अनुमाने ७ सहस्र रुपयांची आर्थिक हानी झाली. देगलूर नाका मार्गावर एक दुचाकी जाळून अनेक वाहनांवर दगडफेक करून हानी करण्यात आली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी ८, शिवाजीनगर पोलिसांनी १४, तर इतवारा पोलिसांनी २२ गुन्हे ४०० जणांविरुद्ध नोंद केले आहेत.


अमरावती येथील हिंसाचार प्रकरणी १५ गुन्हे नोंद, तर ५० जणांना अटक ! – आरती सिंह, पोलीस आयुक्त 

अमरावती – येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १५ गुन्हे नोंद करण्यात आले असून ५० जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच काही लाठ्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.