हळदोणा येथे बालदिनाच्या निमित्ताने एका लहान मुलांच्या कार्यक्रमात पक्षाचा प्रचार करण्याचा तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न फसला !
|
पणजी, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०२२ च्या प्रारंभी होणार्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस उतरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हळदोणा येथे बालदिनाच्या निमित्ताने एका लहान मुलांच्या कार्यक्रमात निमंत्रण नसतांना उपस्थित राहून पक्षाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र मंदिरातील भाविकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. तृणमूल काँग्रेसच्या गटासमवेत कॅमेरे (छायाचित्रक) आदी साहित्य घेऊन कोकणी भाषा समजत नसलेले अनेक भाडोत्री पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या गोव्यातील पत्रकारांनी हे भाडोत्री पत्रकार बनावट असल्याचे उघड केले.
हळदोणा येथे श्री सातेरी भगवती मंदिरात लहान मुलांचा नृत्याचा वर्ग चालू होता. या वर्गाला तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार आणि त्यांचा गट निमंत्रण न देताच पोचले. या वेळी ‘नृत्यवर्गाच्या ठिकाणी निवडणूक प्रचाराची संबंधितांकडे अनुमती घेतली का ?’, असा प्रश्न कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या गोव्यातील पत्रकारांनी तृणमूलचे नेते लवू मामलेदार यांना विचारला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. याविषयी श्री सातेरी भगवती मंदिराचे भाविक गोव्यातील प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘तृणमूलचे गट या ठिकाणी ‘मंदिरात देवाला नमस्कार करण्यासाठी आले आहोत’, असे सांगून आले होते; मंदिरात आल्यावर देवाला नमस्कार करून परत जाण्याऐवजी ते मंदिरात चाललेल्या बालदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला थांबले. श्री सातेरी भगवती मंदिराच्या सभागृहात आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला प्रचार करण्यास देत नाही.’’
तृणमूलच्या गटासमवेत आलेल्या भाडोत्री बनावट पत्रकारांचा उद्दामपणा !
तृणमूलच्या गटासमवेत बनावट पत्रकारही उपस्थित होते. हे पत्रकार भ्रमणभाष आणि महागडे कॅमेरे घेऊन कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होते. या पत्रकारांना गोव्यातील पत्रकारांनी ‘तुम्ही गोव्यातील कोणत्या प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधित्व करता?’, असा प्रश्न केला असता संबंधित एक पत्रकार गोव्यातील पत्रकारांना म्हणाले, ‘‘तुम्ही विचारणारे कोण आहात? मला तुमच्याकडे बोलावेसे वाटत नाही.’’ गोव्यातील पत्रकारांनी ‘‘तुम्ही पत्रकार असल्याचे ओळखपत्र दाखवा’’, असे सांगितले असता हे भाडोत्री पत्रकार याविषयी काहीच माहिती देऊ शकले नाहीत. तृणमूलचे नेते लवू मामलेदार यांना बनावट पत्रकारांविषयी विचारले असता ते म्हणाले,‘‘हे पत्रकार कुठून आले, ते मला ठाऊक नाही.’’
तृणमूल काँग्रेसच्या गोव्यातील वादग्रस्त कृती !
तृणमूल काँग्रेस गेल्या एका मासापासून गोव्यात आली आहे. गोव्यात आल्यापासून पक्षाच्या अनेक कृती वादाच्या भोवर्यात सापडल्या आहेत.
१. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोवा भेटीवर असतांना त्यांनी मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानला भेट दिली. मंदिरातील पुजार्याने दिलेले तीर्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्राशन करण्याऐवजी ते भूमीवर ओतले आणि इतरांवर शिंपडले. तीर्थाचा अवमान केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक माध्यमातून टिकेची झोड उठली.
२. तृणमूल काँग्रेसने गोव्यात ‘बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिच्या चपलेच्या खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींना चिरडून टाकत आहे’, असे दाखवणारे विज्ञापन प्रसिद्ध केले. याला भाजपने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर तृणमूलने त्वरित हे विज्ञापन हटवले. तृणमूलच्या या कृतीचा निषेध म्हणून त्यानंतर तृणमूलच्या गोव्यातील बहुतांश मोठ्या होर्डिंगवरील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या चेहर्याला काळे फासण्यास आले.
३. प्रसिद्धी टॅनिसपटू असलेले लिएंडर पेस हे तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रचारक आहेत. लिएंडर पेस यांनी त्यांच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ‘गोवा एक बेट आहे’, असे खोटे विधान सामाजिक माध्यमांत केले. यावर सामाजिक माध्यमांतून टिकेची झोड उठली आणि ‘लिएंडर पेस यांनी प्रथम गोव्याचा भूगोल जाणून घ्यावा’, असा सल्ला त्यांना सामाजिक माध्यमांतून विविध लोकांनी दिला.