मालेगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर; हिंसाचाराच्या प्रकरणी ५ गुन्हे नोंद !
समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केली !
मालेगाव (जिल्हा नाशिक) – त्रिपुरा येथे मुसलमान समाजाच्या विरोधात झालेल्या कथित घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ‘रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमा’ यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला १२ नोव्हेंबर या दिवशी हिंसक वळण लागले. त्यानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. हिंसाचारप्रकरणी ४००-५०० जणांच्या जमावाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात ३, तर आयेशानगर पोलीस ठाण्यात २, असे ५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी १६ जणांना कह्यात घेतले असून १० जणांना अटक केली आहे. आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
अटक केलेल्यांमध्ये २ सराईत गुन्हेगारांचा समावेश
हिंसाचाराच्या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर काही समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केली आहे, असे निदर्शनास येते. अटक केलेल्यांमध्ये २ सराईत गुन्हेगार आहेत.
हिंसाचार प्रकरणातील ५६ जणांची ओळख पटली आहे. संशयितांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याला ‘स्पेशल स्कॉड’ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह ६ पथके सिद्ध करण्यात आली आहेत. सर्व माहिती, चित्रीकरण, फुटेज, सी.सी.टी.व्ही, प्रत्यक्ष साक्षीदार यांची निश्चिती झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराधाला अटक करणार नाही. दोषींना पोलीस सोडणार नाहीत. – बी.जी. शेखर-पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र. |