हणजूण परिसरात पार्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण
स्थानिकांची उपजिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार
|
म्हापसा, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोना संसर्ग बर्याच प्रमाणात उणावल्याने गोव्यातील उत्तर गोव्यातील किनारपट्टीतील हॉटेलांचा व्यवसाय पूर्ववत् चालू झालेला आहे आणि हॉटेलमध्ये खुल्या जागेत प्रतिदिन पार्ट्यांचे आयोजन केले जात असून यामध्ये मोठ्या आवाजात ‘डिजे’ (मोठ्या आवाजातील ध्वनीप्रक्षेपक) लावून ध्वनीप्रदूषण केले जात आहे. हणजूण येथील नागरिकांनी याविषयी बार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटल आहे की, ‘आरपोरा हिल्स’ या ठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे. याविषयी तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. पोलीस आणि प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने ‘आरपोरा हिल्स’चे व्यवस्थापन सातत्याने नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण करत आहे. या ठिकाणी प्रतिदिन पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे आणि येथील ध्वनीप्रदूषणामुळे ताणतणाव वाढणे, मानसिक त्रास होणे आणि लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणे, असे प्रकार घडत आहेत. ‘आरपोरा हिल्स’ येथे लवकरच एका ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये प्रसिद्ध पाश्चात्त्य संगीताचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला शासनाने अनुमती नाकारावी.