सौ. अर्पिता देशपांडे यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि दिलेली दिशा !
‘मला सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. ही प्रक्रिया राबवण्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, प्रक्रियेच्या वेळी झालेला मनाचा संघर्ष, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळे साधनेला मिळालेली दिशा अन् प्रक्रियेनंतर माझ्यात जाणवलेले पालट यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत. या प्रक्रियेद्वारे देवाने जीवनात अमूल्य असा अमृताचा साठा दिला. त्याविषयी श्री गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
१. प्रक्रिया करण्यापूर्वी असलेली साधनेची बिकट स्थिती
१ अ. सेवेत गंभीर चुका झाल्याने नकारात्मक स्थितीत असणे : प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी माझ्याकडून जिल्ह्यातील प्रसारसेवेत गंभीर चुका झाल्या होत्या. त्या चुका न स्वीकारल्यामुळे मी नकारात्मक स्थितीत होते. त्यामुळे मी माझे साधनेतील एक वर्ष वाया घालवले होते. या काळात मला अनेक शारीरिक त्रास होत होते. मनाची स्थिती ठीक नसल्याने मला सतत अस्वस्थता आणि काळजी वाटत होती.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात ‘साधिका आणि यजमान यांच्याकडे पाहून काय वाटते ?’ हा सूक्ष्मातील प्रयोग करून घेणे, त्या वेळी दोघांवर आवरण असून दोघांमध्ये तीव्र अहं असल्याचे सर्वांनी सांगणे : त्यानंतर रामनाथी आश्रमात आल्यावर आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्यांनी सत्संगात सर्व साधकांना ‘माझ्याकडे आणि माझ्या यजमानांकडे बघून काय वाटते ?’, असे विचारले. त्या सूक्ष्मातील प्रयोगात ‘दोघांवर त्रासदायक शक्तीचे आवरण असून अहंची तीव्रता अधिक आहे’, असे साधकांनी सांगितले. यावर परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘अशी स्थिती असेल, तर साधना कशी होणार ? आताच व्यष्टी साधनेची घडी नीट बसवायला हवी. तुम्ही पुढच्या वेळी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी आश्रमात या.’’
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करू लागल्यावर झालेली मनाची स्थिती
२ अ. मनात प्रतिमा जपण्याचे पुष्कळ विचार येणे : त्यानंतर २ मासांनी आम्ही प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी आश्रमात गेलो. तेव्हा माझ्या मनावर सतत ताण असायचा. ‘मी प्रक्रिया राबवत आहे, हे पाहून इतरांना काय वाटत असेल ?’, असे स्वतःची प्रतिमा जपण्याचे विचार माझ्या मनात येत होते. ‘माझी प्रतिमा इतरांसमोर डागाळली जाऊ नये’, हा अहंचा विचारही माझ्या मनात प्रबळ होता.
२ आ. स्वयंपाकघरात सेवा मिळाल्यावर झालेला मनाचा संघर्ष ! : मला आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्यास सांगितले; परंतु मला ती सेवा मनापासून स्वीकारता येत नव्हती. त्या वेळी ‘मला शारीरिक त्रास आहे. स्वयंपाकघरात सेवा करायला जमणार नाही’, अशी माझी मानसिकता होती. त्यानंतर ‘प्रतिदिन १२ घंटे सेवा करायची आहे’, हे कळल्यावर तर मनाचा आणखीनच संघर्ष झाला. मनात सतत स्वतःविषयीच विचार येत होते. ‘दिवसभरातील सर्व वेळ सेवेला दिल्यावर मला वैयक्तिक वेळ कसा मिळणार ?’, हे विचार मला त्रस्त करत होते.
२ इ. आढाव्याविषयी नकारात्मकता असणे : आढावा सत्संगाच्या १ घंटा आधीपासून मला ताण येत असे. त्या वेळी आढावा देतांना श्वास भरून येणे, रडू येणे, घाईघाईने आढावा देणे, आढावा रहित झाल्यास अथवा मी रुग्णाईत असतांना आढाव्याला जाता येणार नसल्यास बरे वाटणे, अशा प्रकारे माझी आढाव्याविषयी नकारात्मक प्रक्रिया व्हायची.
२ ई. ‘प्रक्रिया सोडून जावे’, असे वाटणे
२ ई १. ‘इतर साधकांप्रमाणे स्वतःलाही प्रसारात पाठवावे’, असे वाटणे : आमच्या सोबत असलेले किंवा नंतर प्रक्रियेसाठी आलेले साधक परत प्रसारात किंवा अन्य सेवेसाठी जात असतांना ‘इतरांना पाठवतात. मग मला का पाठवत नाहीत ? मलाही पाठवायला हवे’, या विचारांनी मला निराशा यायची. साधारण २ मास (महिने) हे विचार माझ्या मनात होते.
२ ई २. अपेक्षेच्या विचारांमुळे प्रक्रियेतील आनंद घेता येत नसल्याचे आढाव्यात लक्षात आणून देणे : माझ्यातील ‘मनमोकळेपणाचा अभाव’ या दोषामुळे मी हे विचार कुणाजवळ बोलू शकले नाही. जेव्हा मी ते विचार आढाव्यात मांडले, तेव्हा ‘माझ्या साधनेसाठी काय आवश्यक आहे, हे मी स्वतःच ठरवत होते आणि ते योग्यच आहे’, असे समजत होते. मनातील हे विचार म्हणजे माझी ‘अपेक्षा’ होती आणि ती पूर्ण न झाल्यामुळे मला निराशा येत होती. तेव्हा ‘मला अधिक कळते’, या अहंच्या पैलूमुळे मला प्रक्रिया राबवतांना शिकण्याच्या स्थितीत राहून प्रयत्नांचा आनंद घेता येत नव्हता’, हे माझ्या लक्षात आणून देण्यात आले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन आणि साधनेला दिलेली दिशा
३ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभूनही त्याचे काहीच न वाटणे, त्यांचे बोलणे आकलन न होणे आणि नंतर हळूहळू स्थिती सुधारू लागणे : प्रक्रियेच्या कालावधीत मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला; पण तरीही मला त्याविषयी काहीच वाटत नव्हते. ‘त्यांना मला काय सांगायचे आहे ?’, याचेही मला प्रारंभी आकलन होत नव्हते. नंतर हळूहळू ‘ते मला काहीतरी शिकवत आहेत’, याची मला जाणीव होऊ लागली.
३ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आतापर्यंतच्या चुका आणि साधकांविषयी मनात येणारे विकल्प लिहून काढण्यास सांगणे अन् तसे केल्यावर मनावरील ओझे नष्ट होऊन हलके वाटणे : परात्पर गुरुदेवांनी मला आतापर्यंत व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना झालेल्या जेवढ्या चुका आठवत असतील तेवढ्या चुका, तसेच ज्यांच्याविषयी मनात विकल्प (पूर्वग्रह अन् अपेक्षा) आहेत, ते सर्व प्रसंग लिहून काढण्यास सांगितले. त्या प्रसंगात लक्षात आलेले माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू लिहून स्वयंसूचनांची सत्रे करण्यास सांगितली. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यानुसार लिखाण केल्यावर मनात साठलेले ६४ प्रसंग माझ्या लक्षात आले. ते सर्व लिहिल्यावर माझ्या मनावरचे फार मोठे ओझे उतरल्याप्रमाणे मला हलके वाटू लागले.
३ अ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चुकांकडे सकारात्मकतेने पहायला शिकवणे : एकाच स्वभावदोषाचे किंवा एकाच अहंच्या पैलूचे अनेक प्रसंग घडल्यावर ‘बापरे, किती चुका होतात !’ असे विचार येऊन माझे मन अस्वस्थ व्हायचे. त्याविषयी गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘अरे वा ! तुमच्या बरेच प्रसंग लक्षात येत आहेत. आणखी जितके प्रसंग तुमच्या लक्षात येतील, तितके येऊ देत. प्रतिदिन त्याच त्याच चुका पाहून ‘किती वेळा तेच तेच घडत आहे !’, याची एक दिवस जाणीव होईल आणि ती चूक टाळण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होतील.’’
मला निराशा येऊ नये; म्हणून ते सतत माझ्या मनात सकारात्मकता आणि उत्साहाचे बीज रोवत होते. त्यामुळे मला ही प्रक्रिया राबवण्याची प्रेरणा मिळत होती.
३ अ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास आणि घरून प्रचंड विरोध असूनही साधनारत असलेल्या साधिकांचे उदाहरण देऊन इतरांकडून शिकवणे : सत्संगात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि घरातून साधनेला विरोध असलेल्या २ साधिका उपस्थित होत्या. कठीण परिस्थितीतही त्या आनंदी होत्या. त्या दोघी साधनेसाठी करत असलेले प्रयत्न सांगत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘‘हे तुमच्यासाठी (तुम्हाला शिकण्यासाठी) आहे’’, असे म्हणून इतरांकडून शिकण्यासाठी मला प्रवृत्त केले. नंतर ते मला म्हणाले, ‘‘त्यांच्यातील आणि तुमच्यातील भेद लक्षात आला का ? तळमळीने अन् मनापासून प्रयत्न केले, तर देव आपल्याला सर्वकाही देतो.’’ त्यांच्या बोलण्यातून मला प्रयत्नांसाठी दिशा मिळत होती.
३ अ ५. ‘सूक्ष्मस्तरावर असलेल्या मनाची स्वच्छता केल्यास सच्चिदानंद जाणवेल’, असे सांगून स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व अधोरेखित करणे : मला अधूनमधून निराशा येत होती. हे मी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी पुढील सूत्र सांगितले, ‘‘शरीर स्थूल आहे, तरी त्याची स्वच्छता करायला किती कष्ट घ्यावे लागतात ? मन तर सूक्ष्म आहे. त्याला स्वच्छ करायला कितीतरी वेळ लागतो ! जे चित्तात आहे, तेच मनाला जाणवत असते. चित्तावर स्वभावदोष आणि अहं यांचे संस्कार नसतील, तर तुम्हाला अंतर्मन अन् बाह्यमन यांत आनंदच जाणवेल. अध्यात्मातील सच्चिदानंदाची अनुभूती येईल. जर अंतरात स्वभावदोष अथवा अहं यांचे संस्कार असतील, तर त्याचे लक्षण म्हणून निराशा किंवा नकारात्मकता जाणवेल.’’ त्यावरून मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व लक्षात आले.
३ अ ६. ‘ज्याप्रमाणे रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्याचे स्वतः ठरवू शकत नाही, त्याप्रमाणे साधकानेही स्वतःच्या मनाने प्रक्रिया सोडून जाणे योग्य नाही’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘एखादा रुग्ण रुग्णालयात भरती असेल, तर तो स्वतःच्या मनाने किंवा सोयीने ‘डिस्चार्ज’ घेऊ शकत नाही. ‘हा रुग्ण बरा झाला आहे’, अशी आधुनिक वैद्यांना निश्चिती वाटल्यानंतरच ते त्याला घरी जाण्याची अनुमती देतात. त्याप्रमाणे साधक स्वभावदोष आणि अहं रूपी रोगाने त्रस्त आहेत. या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांच्यावर आध्यात्मिक उपचार होत आहेत. उत्तरदायी साधकांनी सांगितल्याविना त्यांनी स्वतःच्या मनाने प्रक्रिया सोडून जाणे योग्य नाही. ‘मनापासून प्रक्रिया राबवल्यास ते निश्चितच स्वभावदोषमुक्त होतील’, याची त्यांनी निश्चिती बाळगली पाहिजे.’’
३ अ ७. शिकण्याच्या स्थितीचे महत्त्व सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘सतत कुणाच्या ना कुणाच्या तरी आधारानेच साधनेत पुढे जायचे असते. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून विचारून घेऊन साधनेचे प्रयत्न करणे अपेक्षित आहे.’’
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळे स्वतःत जाणवलेले पालट : जसा कांद्याचा एक एक पदर (पापुद्रे) सोलावा, त्याप्रमाणे माझ्यावर आलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणाचा एक एक थर परात्पर गुरुदेवांच्या या सत्संगांनंतर निघून जात होता. सत्संगात ते मला निरनिराळे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देत होते. त्यामुळे ‘माझी देवावरची श्रद्धा किती अल्प आहे !’, याची मला जाणीव होत होती. त्यांच्या कृपेमुळे माझ्या मनात साधना आणि प्रक्रिया यांविषयी सकारात्मकता निर्माण होऊन ‘गुरु आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवणार आहेत’, ही जाणीव वाढली.
– सौ. अर्पिता विपीन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२०.११.२०१६)
(क्रमशः)
|