हिंदु समाजाला धर्मरक्षणासाठी सातत्याने स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापित होणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
भाग्यनगर – शिवाजी-संभाजी रक्तगटाचा महाराष्ट्र आणि देश उत्पन्न करणे हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुख्य काम आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि साहस दाखवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अशीच प्रेरणा सध्याच्या काळातही आवश्यक असून हिंदुसमाजाला धर्मरक्षणासाठी सातत्याने स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापित होणे आवश्यक. त्यासाठी येथील युवकांनी अधिकाधिक या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. नुकतेच ते भाग्यनगर येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापनेच्या संदर्भात आयोजित मार्गदर्शनात बोलत होते. याचे आयोजन उद्योजक श्री. विनोद सेठ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले,
१. ४ जून २०१७ या दिवशी रायगडावर धारकर्यांनी सिंहासन उभारण्याचा निर्धार केला असून याला आता ४ पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. येणार्या सव्वा-दीड वर्षांत आम्ही हा निर्धार पूर्ण करू.
२. शिवछत्रपतींमध्ये भारतमातेच्या रक्षणाची-धर्मरक्षणाची जी आग होती ती आग जगणारी माणसे आपल्याला उत्पन्न केली पाहिजेत. ही आग सतत तेवत ठेवण्याचे कार्य सुवर्ण सिंहासन करणार आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असे कार्य करणे, हेच आपले ध्येय असून तीच आपली स्वातंत्र्याची, मातृभूमीची उपासना आहे.
४. शहाजी राजेंनी सहस्रो ग्रंथांचे ग्रंथालय सरस्वती महाल म्हणून स्थापन केले आहे. अशांचा आदर्श आपण नेहमीच समोर ठेवला पाहिजे.