प्रदूषित देहली !

संपादकीय

प्रदूषण रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनप्रबोधन दोन्हींची आवश्यकता !

देहली येथील प्रदूषणाने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले आहे. तेथे हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक ५०० च्या पुढे म्हणजे धोकादायक पातळीवर आहे. स्वित्झर्लंडस्थित हवामान समूह ‘आयक्यूएअर’ने देहलीला ‘जगातील सर्वांत प्रदूषित शहर’ म्हणून घोषित केले आहे. सर्वाधिक प्रदूषित पहिल्या दहा शहरांमध्ये कोलकाता आणि मुंबई यांचाही समावेश आहे. तसेच पाकमधील लाहोर आणि चीन येथील चेंदगू ही शहरेसुद्धा या सूचीत आहेत. देहलीतील प्रदूषणामुळे शाळा आणि महाविद्यालये १ आठवडा बंद रहाणार आहेत. चालू असलेली बांधकामेही बंद रहाणार असून सर्व सरकारी कर्मचारी आठवडाभर घरूनच काम करणार आहेत. नागरिकांना घरातही मुखपट्टी बांधून घरकाम करावे लागत आहे. याविषयी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट झालेल्या एका याचिकेमुळे न्यायालयाने सरकारला ‘दळणवळण बंदी अथवा वाहनांवर बंदी घाला; मात्र प्रदूषण नियंत्रणात आणा’, असे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी देहलीतून वहाणार्‍या यमुना नदीचे पाणी पुष्कळ प्रदूषित होऊन त्यातून विषारी फेसाचे मोठे थर पाण्यावर तरंगत होते. परिणामी छट पूजा करतांना भाविकांना पुष्कळ अडचणी आल्या. देहलीतील प्रदूषणाचे कारण ‘हरियाणा येथे शेतातील धसकटे अथवा तण जाळून धूर होतो’, असे सांगितले जाते. तसेच काहींनी देहलीतील फटाक्यांचे कारणही दिले; मात्र धसकटे जाळणे विशिष्ट कालावधीपुरते, तर फटाके काही दिवस वाजवले जातात. देहलीतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना राबवल्या जातात; मात्र त्यांचा तेवढा लाभ होतांना दिसत नाही. आप सरकारने ‘सम आणि विषम दिवशी वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या गाड्या वापराव्यात’, अशी योजना राबवली; मात्र ती कालांतराने बंद झाली कि त्याकडे दुर्लक्ष झाले, हे सरकारलाच ठाऊक ! देहली हे राजधानीचे शहर असल्याने तेथे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. देहली अथवा अन्य शहरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून त्याचाच उपयोग करण्याविषयी लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सध्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. त्या दिवशीही प्रवास करायचा असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे. देहलीत प्रदूषण करणारे उद्योगधंदे शहराबाहेर हालवले पाहिजेत. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक मास दळणवळण बंदी असतांना देहलीतील हवेतील प्रदूषण दूर होऊन हवा शुद्ध झाली होती. यामुळे अगदी दूरदूरची ठिकाणे, हिमालयातील पर्वतरांगांकडील भाग स्पष्टपणे दिसत होता. सध्याच्या प्रदूषित हवेमुळे अगदी जवळची गोष्टही दिसत नाही. यातून हे प्रदूषण टाळता येणे शक्य आहे, हे लक्षात येते. कोणतीही उपाययोजना यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. देहली सरकारने राबवलेल्या उपाययोजना अपुर्‍या वाटत असल्यानेच न्यायालयाने थेट दळणवळण बंदी घोषित करून प्रदूषण रोखण्याविषयी सुचवले आहे. हवेचे झाले, येथील पाणीही प्रदूषित आहे, त्याचे काय ? सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे, हे दोन्ही करणे आवश्यक आहे.