‘पाम’ तेलाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष
नवी देहली – ‘पाम’ तेलाच्या सेवनामुळे कर्करोग होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनाद्वारे काढण्यात आला. हे संशोधन बार्सिलोनामधील ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन बायोमेडिसीन’च्या डॉ. ग्लोरिया पास्कुअल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ‘झी न्यूज’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
१. या संशोधनात म्हटले आहे की, अनेक खाद्यपदार्थ आणि सौंदर्य उत्पादने यांमध्ये पाम तेल वापरले जाते. ‘पामिटिक अॅसिड’ नावाचे संयुग पाम तेलामध्ये असते. हे संयुग कर्करोगाच्या प्रारंभीच्या टप्प्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
२. हे संशोधन करतांना उंदरांना पामिटिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ दिले गेले. ते खाल्ल्यानंतर त्वचा आणि तोंड यांच्या ‘मेटास्टॅटिक ट्यूमर’मध्ये पालट झाल्याचे आढळले. ‘मेटास्टॅटिक ट्यूमर’ हा सर्वसामान्य ट्यूमरसारखा कर्करोगाचा प्रकार आहे. तो सहसा बरा होत नाही. त्यावर केवळ उपचार केले जातात.
३. ‘वर्ल्डवाईड कॅन्सर रिसर्च’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेलन रिपन म्हणाल्या की, हा शोध, हे मोठे यश आहे. अन्न आणि कर्करोग यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे ?, हे या संशोधनातून समजण्यास साहाय्य झाले. कर्करोगावर नवीन उपचारपद्धती चालू करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ?, हे पहावे लागेल.
४. चॉकलेट, पीनट बटर, पिझ्झा, इन्स्टंट नूडल्स, शाम्पू, टूथपेस्ट, डिओडरंट आणि लिपस्टिक यांसह इतर अनेक गोष्टींमध्ये पाम तेलाचा वापर केला जातो. याचा अतीवापर धोकादायक ठरू शकतो.