गेल्या वर्षभरातील देशातील सर्वांत मोठी कारावाई ! – एकनाथ शिंदे, पालकमंत्री

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईचे प्रकरण

पालकमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली – गडचिरोली पोलीस आणि सी-६० सैनिकांचे पथक यांनी मिळून २६ नक्षलवाद्यांना ठार मारले. ही गेल्या वर्षभरातील देशातील सर्वांत मोठी कारवाई आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी ही कारवाई करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन करत कौतुक केले.

शिंदे पुढे म्हणाले, ‘‘सर्वांत जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश राज्यांतील नक्षल्यांचा नेता होता. तो कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा. असे असतांनाही पोलिसांनी त्याचा वेध घेतला. त्याच्यावर राज्यात ५० लाखांपेक्षा अधिक रकमेचे पारितोषिक होते. इतर राज्यांतही त्याच्यावर अनेक पारितोषिके होती. मी लवकरच घायाळ सैनिकांना भेटायला जाणार आहे. या कारवाईमुळे गडचिरोली पोलिसांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या घटनेत ४ सैनिक घायाळ झाले आहेत. त्यांना तात्काळ नागपूर येथे हालवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.’’