वारकर्यांना कृतार्थ करणारा पंढरपूर येथील वारीचा अलौकिक सोहळा !
आज (१५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी) असलेल्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने…
१. वारीच्या वेळी संपूर्ण पंढरीत विठ्ठलनामाचा गजर ऐकू येणे
‘वारीला पंढरीत जनसागर उसळतो आणि चंद्रभागेला भेटण्यासाठी जातो.
‘विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ।’
– संत चोखामेळा
अर्थ : विठ्ठलनामाचा गजर संपूर्ण पंढरीत घुमला आहे.
सार्या पंढरीत विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो. पहावे तिकडे दिंड्या आणि पताका डोलत असतात. मृदंग आणि टाळ यांच्या तालावर वारकरी नृत्य करतात. ते बेभान होऊन उड्या मारतात आणि गातात.
२. पंढरपुरात संतांनी कीर्तनाचा गजर करणे
संत जनाबाई म्हणते,
तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ।।
रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ।।
अर्थ : सर्व संत पंढरीत जमल्यावर कीर्तनाचा गजर करतात. पंढरपुरात साक्षात् भगवंत उभा आहे. त्याचे दोन्ही चरण शोभिवंत आहेत. सर्व संतमंडळी कीर्तन करतांना नाचू लागतात. त्यामुळे कीर्तनात अधिकच रंग भरतो.
३. वारीच्या वेळी पंढरपूर आनंदाने दुमदुमणे
वारीमध्ये जिकडे-तिकडे आनंदीआनंद असतो. अगदी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’ या अभंगवाणीत कीर्तन आणि भजन यांद्वारे सारे पंढरपूर महासुखाने दुमदुमलेले असते.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ।।
– संत ज्ञानेश्वर महाराज
अर्थ : वारीमध्ये उंच पताका झळकत असतात. टाळ-मृदंग वाजत असतात. विठ्ठलाचे सारे वारकरी आनंदाने आणि प्रेमाने विठ्ठलनामाचा गजर करतात.
४. सुखासाठी तळमळणार्या मानवाने पंढरीला जावे !
संत नामदेव महाराज म्हणतात, ‘हे मानवा, सुखासाठी तळमळ करतोस ना ? मग एकवेळ पंढरीला जा. तू मग सुखरूपच होशील. तिथे वारीला गेल्यावर वारकरी एकमेकांना उराउरी भेटतात. तिथे काही उच्च-नीच भावना नाही.’
पंढरीच्या लोका । नाही अभिमान ।
पाया पडती जन । एकमेका ।।
अर्थ : पंढरीच्या लोकांमध्ये (संतांमध्ये) अहंकाराचा लवलेशही नाही. ते परस्परांना आदरपूर्वक वंदन करतात.
५. वारी म्हणजे आनंद सोहळाच !
पंढरीत संतसमागम आहे. इथे भक्तीला महापूर येतो. येथील सुखाचा अंतपार ब्रह्मादिकांनाही लागणार नाही. इथे प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. पंढरीला वारकरी आले. ते जयजयकार करू लागले. त्या सुखाचा पार केवळ पुंडलिकच जाणतो.
कीर्तन, भजन आणि प्रवचन ऐकण्याचा आनंद काही अलौकिक असतो. चंद्रभागेच्या वाळवंटात शेकडो फडांवर भजन-कीर्तन चालू असते. त्यामुळे काम-क्रोधादी विकार लयाला जातात. मन शांत होऊन हरिभजनात तल्लीन होते. मन प्रसन्न होते आणि अंगावर रोमांच उभे रहातात. विठ्ठलाला पाहून डोळे तृप्त होतात. भजन-कीर्तन ऐकून कान सुखावतात. विठ्ठलाचे नामस्मरण आणि भजन करून जीभ आनंदी होते. वैष्णवांच्या मांदियाळीत त्यांचा स्पर्श झाल्याने अंग पुलकित होते. तुळशीच्या गंधाने घ्राण (नाक) तृप्त होते. टाळ-मृदंग वाजवून हात मुदित (आनंदी) होतात, तर भजनात नाचून आणि उड्या मारून पाय कृतार्थ होतात. सर्व इंद्रिये आणि मन यांना आनंद देणारा हा वारीचा सोहळा म्हणजे एक आनंद सोहळा आहे. काला तर वारीचा परमोच्च बिंदू आहे. उच्च-नीच भेद न मानता एकमेकांच्या तोंडात काल्याचे घास भरवणारी ही पंढरीची वारी, म्हणजे सामाजिक अभिसरणाचा उत्कृष्ट प्रयोग आहे आणि तो वारकरी पंथाने यशस्वी केला आहे.’
– भागवताचार्य वा.ना. उत्पात
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक २०१४)