कोल्हापूर-सातारा पॅसेंजर १६ नोव्हेंबरपासून होणार चालू !
कोल्हापूर, १४ नोव्हेंबर – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १९ मास बंद असलेली कोल्हापूर-सातारा पॅसेंजर १६ नोव्हेंबरपासून चालू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ डब्ब्यांची ‘डेमो’ रेल्वेगाडी सोडण्यात येणार असून प्रारंभी केवळ एकच फेरी होणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार आहे. ही गाडी पहाटे ५.३० वाजता सातार्याहून निघेल आणि सकाळी ९.४५ वाजता कोल्हापुरात पोचेल. यानंतर दुपारी ४.४५ वाजता कोल्हापूर येथून निघून रात्री ९.५० वाजता सातारा येथे पोचणार आहे.
या गाडीमुळे सामान्य नागरिक, नोकरदार, तसेच विद्यार्थी यांची सोय होणार आहे. याशिवाय अन्य ‘पॅसेंजर’ गाड्याही चालू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. या संदर्भात मिरज रेल्वे कृती समितीचे सदस्य श्री. सुकुमार पाटील म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये जशी लोकल चालू केली. त्याच धर्तीवर इथेही कोरोनाच्या प्रादुर्भावाचे नियम पाळून पॅसेंजर गाडी चालू करावी अशी आमची मागणी होती. बसच्या संपाच्या पार्श्वभूमीवर किमान एक गाडी चालू होत असली तरी तो लोकांना दिलासा आहे. रेल्वेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि हळूहळू सर्व गाड्या चालू होतील, अशी आशा बाळगतो.’’