कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहनांची सोय !
सोलापूर – कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहनांची व्यवस्था एस्.टी.च्या तिकीट दराइतकी करण्यात आली आहे. एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे पंढरपूर येथे येणार्या भाविकांची कार्तिकी यात्रेच्या तोंडावर होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभाग काम करत आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिवहन अधिकार्यांच्या वतीने विशेष वाहनांची व्यवस्था पंढरपूर बस स्थानक येथून करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाशांसाठी २४ घंटे हेल्पलाईन चालू करण्यात आली असून प्रवाशांनी ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप; गैरसोय टाळण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय#STBusStrike https://t.co/SntIS2iiCq
— Maharashtra Times (@mataonline) November 8, 2021
यामध्ये सांगोला, मिरज, कुर्डूवाडी, पुणे, बार्शी, संभाजीनगर अशा ठिकाणी वाहने प्रवाशांना घेऊन जात आहेत. प्रामुख्याने कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेगाड्यांची संख्या भरपूर असल्याने कुर्डूवाडी, सांगोला, मिरज अशा रेल्वे स्थानकापर्यंत परिवहन विभागाच्या वतीने खासगी वाहतूक केली जात आहे. खासगी वाहनातून वाहतूक होत असली तरी सुरक्षा आणि परिवहन विभागाच्या सर्व नियमांची कार्यवाही करूनच वाहतुकीस अनुमती दिली जात आहे.