६५ वर्षांच्या पुढील भाविकांनाही श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आता ६५ वर्षांवरील भाविकांसह गर्भवती महिलांनाही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथील केल्याने वारकर्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येणार्या भाविकांमध्ये सर्वांत अधिक संख्या ही ६५ वर्षांच्या पुढील वारकर्यांची असते; मात्र मागील २ वर्षांपासून या भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता आले नव्हते.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गोपाळपूरपर्यंत दर्शनरांग उभी करण्यात आली असून भाविकांचे निवास तळ अशी ओळख असलेल्या ६५ एकर परिसराचीही स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी वहाते पाणी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.