पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही सेवा भावाच्या स्तरावर करण्यासाठी साधकांना केलेले मार्गदर्शन  !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. या लेखात ‘अभियानाची सेवा भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, याविषयी पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन पाहूया.

(भाग ५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/518018.html

१. भावसत्संगाचे नियोजन करणे

‘साधकांकडून सेवा उत्साहाने भावपूर्ण आणि परिपूर्ण व्हावी, त्यांना साधनेची योग्य दिशा मिळून प्रयत्न करता यावेत, साधकांमध्ये गुणवृद्धी व्हावी अन् साधकांवरील आवरण न्यून व्हावे’, या उद्देशाने भावसत्संगाचे आयोजन केले होते. पू. रमानंद गौडा यांनी हा भावसत्संग एक दिवस आड ‘ऑनलाईन’ घेतला.

२. भावसत्संगाचे स्वरूप

अ. प्रारंभी ३० मिनिटे भावप्रयोगात मानसपूजा घेतली. परात्पर गुरुदेवांच्या दर्शनासाठी रामनाथी आश्रमात जाणे आणि त्यांची पाद्यपूजा करणे, कृष्णलोक, शिवलोक आणि विष्णुलोक यांची अनुभूती घेणे, अशी मानसपूजा करवून घेतली.

आ. त्यानंतर १५ ते २० मिनिटे साधकांना मागील वेळी दिलेल्या ध्येयानुसार ‘त्यांचे प्रयत्न कसे झाले ?’, याविषयी साधकांनी अनुभव आणि अनुभूती सांगणे.

इ. शेवटी १० मिनिटे ‘पुढील दिवसांत कोणते ध्येय ठेवून प्रयत्न करायचे ?’, याविषयी पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शन करणे’, असे स्वरूप ठेवले होते.

३. साधकांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नांतून अन्य साधकांना दिशा आणि स्फूर्ती मिळणे

भावसत्संगात साधकांना ध्येय देतांना ‘साधकामध्ये एखाद्या गुणाचा अभाव असल्यास त्याचे कोणते स्वभावदोष आणि अहं कार्यरत होतात, त्याचा परिणाम कसा होतो आणि यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी पू. रमानंद यांनी साधकांना सांगून प्रयत्न करवून घेतले. ‘सत्संगात प्रतिदिन एका जिल्ह्यातील ३ – ४ साधकांनी प्रयत्न सांगायचे’, असे ठरवले होते. भावसत्संगात सांगितलेल्या ध्येयानुसार ‘साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ याविषयी साधकांना सांगण्यास सांगितले होते. त्यामुळे अन्य साधकांना दिशा आणि स्फूर्ती मिळत होती.

४. साधनेत तळमळीचे महत्त्व

४ अ. साधक आणि शिष्य यांचा महत्त्वपूर्ण गुण म्हणजे तळमळ ! : अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. साधक आणि शिष्य यांचा महत्त्वपूर्ण गुण म्हणजे तळमळ ! साधकात तळमळ असल्यास कोणतीही कृती करतांना त्याच्या मनात ‘सेवा चांगल्या प्रकारे कशी करू ? कोणाला विचारू ?’, असे विचार असतात.

४ आ. ‘तळमळ’ या गुणाचा अभाव असल्यास साधनेत पुढे जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होणे आणि तळमळ नसल्यास ईश्वराचे साहाय्य मिळणे न्यून होणे : साधकात ‘तळमळ’ या गुणाचा अभाव असल्यास त्याची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांवर परिणाम हातो. या गुणाच्या अभावामुळे साधकातील इच्छाशक्तीचा भाग न्यून असतो आणि त्याचे वागणे स्वेच्छेने असते. त्याच्यात विचारून करण्याची वृत्ती नसते. त्यामुळे त्याला साधनेत पुढे जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होतो. साधकात तळमळ नसल्यास त्याला ईश्वराचे साहाय्य मिळण्याचे प्रमाण न्यून होते.

४ इ. स्वभावदोषावर मात करण्यासाठी करायचे प्रयत्न : साधकाने प्रतिदिन ‘कोणत्या प्रसंगात तळमळीचा अभाव लक्षात आला ? त्यात कोणता स्वभावदोष आड आला ?’, त्याचा अभ्यास करायचा. साधकाने ते लिहून ‘त्यावर कोणती योग्य कृती करणे अपेक्षित आहे ?’, हे लिहून तशी तत्परतेने कृती करणे आवश्यक आहे.

४ ई. तळमळ असल्यास गुरुकार्य माझे वाटून गुरुकार्याचा ध्यास निर्माण होणे आणि प्रतिदिन साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे आवश्यक असणे : ज्यांच्यामध्ये तळमळ असते, ते सतत उत्साही असतात आणि इतरांमध्येही उत्साह निर्माण करतात. त्यांना स्वतःलाही आनंद मिळतो आणि ते इतरांनाही आनंद देतात, तसेच ते अन्य साधकांना साधनेसाठी प्रेरणाही देतात. ‘ज्यांच्यात तळमळ आहे, त्यांना गुरुकार्य माझे आहे आणि प्रत्येक दायित्वही माझेच आहे’, असे वाटून त्यांच्यात गुरुकार्याचा ध्यास निर्माण होतो अन् ‘समष्टीसाठी मी कसा समर्पित होऊ ?’, असे त्यांना वाटते. आपण प्रत्येक कृती तळमळीने केल्यास ती गुरुदेवांना अपेक्षित अशी होते. आपण प्रतिदिन व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करायला हवेत.

५. स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू कार्यरत असल्याने साधक साधनेचे प्रयत्न करण्यासाठी परिश्रम घेत नसणे

आपण स्वसुखासाठी कितीही परिश्रम घ्यावे लागले, तरी घेतो; मात्र आपली साधनेसाठी परिश्रम घेण्याची सिद्धता नसते. आपण साधनेचे थोडे प्रयत्न केले, तरी आपल्याला लगेच अल्पसंतुष्टता येते. त्या वेळी आपली ‘कुणीतरी सांगते आणि आपण करतो’, अशी मानसिकता असते. ‘आपण परिश्रम का घेत नाही ?’, याचा अभ्यास केला, तर त्या वेळी ‘आपल्यातील पुष्कळ स्वभावदोष आणि अहंचे पैलू कार्यरत असतात’, हे लक्षात येईल. हे सर्व स्वभावदोष आणि अहंचे पैलू साधनेत पुढे जाण्यासाठी घातक असतात. असे स्वभावदोष असल्यावर आपण सेवा आणि साधना करण्यात न्यून पडतो.

६. स्वतःची पूर्ण क्षमता वापरून साधनेचे प्रयत्न केल्यास क्षमतेत वाढ होणे आणि या सर्वांमुळे ईश्वराचे साहाय्य मिळून श्रद्धा वाढणे

आपण थोडेसे परिश्रम घेतले, तरी आपला साधना करण्याचा उत्साह वाढतो. आपण पूर्ण क्षमतेने साधनेचे प्रयत्न केल्यास आपल्या क्षमतेत वृद्धी होते. तेव्हा ‘गुरुकार्य माझे आहे’, या भावामुळे कितीही कष्ट झाले, तरी चालतील’, असा आपला विचार असतो. आपल्यातील ‘विचारून करणे, स्वीकारणे, वेळेवर आढावा देणे, मनमोकळेपणा आणि परिपूर्ण सेवा करणे’, या गुणांमध्ये वृद्धी होते. या सर्वांमुळे आपल्याला ईश्वराचे साहाय्य मिळते आणि त्याच्याप्रती श्रद्धा वृद्धींगत व्हायलाही साहाय्य होते.

७. परात्पर गुरुदेवांनी एकट्याने दिवसरात्र परिश्रम घेऊन सनातन संस्थेचे नाव विश्वात पोचवले, साधकांनी साधना आणि गुरुकार्य चांगले होण्यासाठी परिश्रम घेतल्यास त्यांच्यावर भगवंताची अपार कृपा होईल !

याचे एक आदर्श उदाहरण, म्हणजे आपले परात्पर गुरुदेव आहेत. काही वर्षांपूवी त्यांनी अनेक ठिकाणी एकट्याने जाऊन, दिवसरात्र परिश्रम घेऊन सनातन संस्थेचे नाव विश्वभरात पोचवले. आपल्याला इतके परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. आपण थोडे जरी परिश्रम घेतले, तरी आपली साधना आणि गुरुकार्य चांगले होऊ शकते. आपल्याला ठाऊक आहे, ‘कितीही कठीण प्रारब्ध असले, तरी ते गुरुकृपेने नष्ट होते.’ त्यामुळे आपण थोडे जरी परिश्रम घेतले, तरी आपल्यावर गुरुकृपेचा अखंड वर्षाव होत रहातो. कोणतीही सेवा किंवा परिस्थिती आली, तरी आपण साधना म्हणून परिश्रम केले, तर आपल्यावर भगवंताची अपार कृपा होते.’’

– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)