महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. प्राजक्ता जोशी यांचे ‘रमल शास्त्री’ परीक्षेत सुयश !
कुडाळ – रामनाथी, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ज्योतिष समन्वयक तथा ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी ‘रमल शास्त्री’ ही पदवी प्राप्त केली आहे. ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालय’, या संस्थेद्वारे याविषयी ११ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘रमल शास्त्री’ ही पदवी प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र संस्थेद्वारे सौ. जोशी यांना ‘ऑनलाईन’ प्रदान करण्यात आले. यासह सौ. प्राजक्ता जोशी ‘फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था’, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली ‘हस्तसामुद्रिक प्रबोध’ परीक्षा ७३ टक्के गुणांसह विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्या आहेत.
‘रमल शास्त्री’ या पदवीसाठी ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालया’चे अध्यापक तथा ‘रमल तज्ञ’ श्री. चंद्रकांत शेवाळे आणि ‘हस्तसामुद्रिक प्रबोध’ पदवीसाठी ‘फलज्योतिष अभ्यास मंडळा’चे संस्थापक-संचालक श्री. विजय जकातदार यांचे लाभलेले मार्गदर्शन अन् परात्पर गुरु डॉ. आठवले सातत्याने देत असलेली प्रेरणा यांमुळेच हे यश मिळाले. हे यश परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करते’, अशी कृतज्ञता सौ. जोशी यांनी व्यक्त केली.
हस्तसामुद्रिक शास्त्रहाताच्या तळव्याचा आकार, उंचसखलपणा, रंग, त्यावरील त्वचेचे स्वरूप, बोटांची ठेवण, त्यांची लांबी-रुंदी, नखे आणि त्यांचा आकार, तळहातावरील उंचवटे, रेषा अन् चिन्हे या सर्वांच्या अवलोकनावरून परंपरा प्राप्त अनुभवाधिष्ठित नियमांच्या साहाय्याने माणसाचा स्वभाव, अनुवंश, पात्रता आणि घडलेल्या अन् पुढे घडणार्या सुख-दुःखात्मक घटना यांचा अंदाज वर्तवणारे शास्त्र म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र होय. रमल शास्त्रभूत, भविष्य आणि वर्तमान ज्ञात होण्याकरिता भगवान शंकरांनी पार्वती मातेला जे ज्ञान प्राप्त करून दिले, त्याला ‘रमल शास्त्र’ म्हणतात. या अद्भुत विद्येचा उपयोग द्वापरयुगापासून केला जात आहे. रमल कुंडलीच्या सर्व स्थानांद्वारे प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी ? हे अभ्यासले जाते. |