श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्यासाठी राज्य सरकारची अनुमती !
|
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राज्य सरकारने श्री विठ्ठलाला अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यासाठी अनुमती दिली आहे. मागील काही वर्षांत काही भाविकांनी श्री विठ्ठलाला लहान दागिने अर्पण केले होते, ते देवासाठी वापरता येत नसल्याने पोत्यात बांधून ठेवण्यात आले होते. यामध्ये २८ किलो सोने असून ९९६ किलो चांदीचे दागिने आहेत.
१. कार्तिकी यात्रेनंतर सोने आणि चांदी यांच्या दागिन्यांतील दोरे, खडे, हिरे आणि माणिक असलेले दागिने वितळवण्यात येणार असून ५ जणांच्या समितीच्या देखरेखीखाली वेगळे करून व्यवस्थित ठेवले जाणार आहेत. शेष राहिलेले सोने आणि चांदी यांचा विमा उतरवून सुरक्षितपणे मुंबई येथे वितळवण्यासाठी नेण्यात येणार आहे. प्रारंभी सर्व सोने आणि चांदी वितळवून त्याचे २-२ नमुन्याचे तुकडे बाजूला काढून त्यानंतर सर्व सोने आणि चांदी यांचे शुद्धीकरण केले जाणार आहे.
२. सरकारच्या आदेशानुसार या दागिन्यांपासून मिळणारे शुद्ध सोने आणि चांदी यांच्या विटा बनवण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपुर्द केल्या जाणार आहेत. त्यानुसार मंदिर समितीच्या सदस्यांची निवड आणि सोने वितळवण्यासाठीचा दिनांक मंदिर समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे.