‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

  • नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे

हा नामजप ऐकल्याने चाचणीतील सर्वच साधकांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत असले, तरी हा नामजप कोणी करावा आणि कोणी करू नये, तसेच किती वेळ करावा, हे समजण्यासाठी पुढील सूत्रे लक्षात घ्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करू नये; त्यांनी नामजपादी उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत

‘निर्विचार’ हा नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारा आहे. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्‍या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे वाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना नामजपादी उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत. या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.’

२. ‘आध्यात्मिक त्रास असणारे अन् ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पातळी असलेले साधक ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप त्यांना असणार्‍या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.’

३. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा

‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्‍या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा. कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करून बघावा.’

४. आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करावा

‘निर्विचार’ हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो. ‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा असल्याने आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांनी हाच नामजप करावा. साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करून बघावा.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले ४ साधक, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे ४ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले ३ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे ४ साधक, १ दैवी बालिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, असे एकूण १६ साधक अन् १ संत सहभागी झाले. चाचणीतील साधक आणि संत यांना १८ ते २५ जुलै २०२१ या कालावधीत प्रतिदिन ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप १० मिनिटे ऐकवण्यात आला. या चाचणीत ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर काय परिणाम होतो ?, तसेच पौर्णिमेचा साधकांवर काय परिणाम होतो ?, हेही अभ्यासण्यात आले.

टीप – २३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने त्या दिवशी प्रयोग नव्हता; कारण त्या दिवशी स्पंदने निराळी असल्यामुळे ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे निराळी आली असती.

१ अ. चाचणीतील साधकांवर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा सकारात्मक परिणाम होणे : चाचणीतील साधकांवर या नामजपाचे झालेले परिणाम दर्शवणारी सारणी पुढे दिली आहे.

१ आ. चाचणीतील साधकांवर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा परिणाम २ दिवस टिकून रहाणे : २५.७.२०२१ या दिवशी नामजपाचा प्रयोग संपल्यावर दुसर्‍या दिवसापासून (२६.७.२०२१ पासून) प्रतिदिन साधकांची ते त्यांच्या मूळ नोंदीला (Baseline Reading) येईपर्यंत निरीक्षणे करण्यात आली. या कालावधीत त्यांना हा नामजप ऐकवण्यात आलेला नव्हता. चाचणीतील सर्व साधक २७.७.२०२१ या दिवशी त्यांच्या मूळ नोंदीवर आले. यातून ‘साधकांवर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ नामजपाचा परिणाम अनुमाने २ दिवस टिकला’, असे लक्षात आले.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

२. चाचणीतील सर्व साधकांवर पौर्णिमेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येणे

अन्य दिवसांच्या तुलनेत २४ आणि २५ जुलै या दिवशी चाचणीतील साधकांवर नामजपापूर्वी आवरणाचे प्रमाण अधिक होते, असे दिसून आले. याविषयी मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘‘अमावास्येच्या २-३ दिवस आधीपासून त्रास वाढतो; पण पौर्णिमेच्या वेळी पौर्णिमा झाल्यावर पुढील २-३ दिवस त्रास वाढतो. याचे कारण हे की, अमावास्येच्या २-३ दिवस आधीपासून मोठ्या वाईट शक्ती काळी शक्ती मिळवतात आणि पौर्णिमेला ते काळी शक्ती प्रक्षेपित करतात.’’ यामुळे अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी त्रास वाढतात.

थोडक्यात, या प्रयोगातून ‘पौर्णिमेच्या नंतर पुढील २-३ दिवस साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ का झाली ?’, हे लक्षात येते. या काळात साधकांभोवती अधिक प्रमाणात असलेल्या त्रासदायक आवरणाशी लढण्यात त्यांची ऊर्जा व्यय होते. त्यामुळे पौर्णिमेच्या नंतर पुढील २-३ दिवस साधकांना थकवा जाणवतो.

३. पौर्णिमेच्या आधी २-३ दिवस आणि पौर्णिमा झाल्यानंतरही पुढील २ दिवस सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ होणे

नामजप ऐकल्यानंतर चाचणीतील सातही दिवस सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली; पण पौर्णिमेच्या आधी २-३ दिवस आणि पौर्णिमा झाल्यानंतर पुढील २ दिवस सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

३ अ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पौर्णिमेच्या आधी २-३ दिवस वाढ होण्याचे कारण : २३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सद्गुरु डॉ. गाडगीळ हे ‘सद्गुरु’पदावरील समष्टी संत अन् त्यातही सनातनचे आध्यात्मिक त्रासांवरील ‘उपायगुरु’ असल्याने त्यांच्याकडून साधकांच्या कल्याणार्थ गुरुपौर्णिमेच्या २-३ दिवस आधीपासूनच गुरुतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होण्यास आरंभ झाले.

३ आ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पौर्णिमा झाल्यानंतरही २ दिवस वाढ होण्याचे कारण : २३.७.२०२१ या दिवशी पौर्णिमा होती. पौर्णिमा झाल्यानंतर पुढील २-३ दिवस साधकांच्या त्रासांत वाढ होते. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यामध्ये समष्टीचे त्रास अल्प व्हावेत, ही प्रचंड तळमळ असल्याने त्यांच्याकडून समष्टीच्या कल्याणार्थ अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले.

थोडक्यात, संतांमधील चैतन्य सदैव समष्टीच्या कल्याणार्थ कार्यरत असते, हेच यातून लक्षात येते. यासाठी संतांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ नामजपाच्या प्रयोगाचा निष्कर्ष

या चाचणीतून ‘हा जप आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांसाठी उपयोगी पडतो’, हे लक्षात येते. यावरून याची परिणामकारकता लक्षात येते.

थोडक्यात, ‘श्री निर्विचाराय नमः ।’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘निर्विचार’ हे तिन्ही नामजप साधकांना निर्गुण स्थितीला घेऊन जाणारे आहेत. या तिन्ही नामजपांमागे श्रीगुरूंचा (परात्पर गुरु डॉक्टरांचा) संकल्प कार्यरत आहे. त्यामुळे साधकांनी या तिन्ही नामजपांपैकी कोणताही नामजप केला, तरी साधकांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणारच आहेत. ’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.१०.२०२१)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.