माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ !
मुंबई – आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी त्यांची कोठडीतील मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पुन्हा ३ दिवसांची वाढ केली आहे. १ नोव्हेंबर या दिवशी देशमुख यांना अटक करण्यात आली होती.
ऋषिकेश देशमुख यांना दिलासा नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र तूर्तास न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. या जामिनावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ऋषिकेश यांच्यासह अन्य देशमुख कुटुंबियांनाही अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.