‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल २४ घंट्यांत मिळण्याच्या शासनाच्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार उघड !
|
मुंबई, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. एका दिवसाला सहस्रोंच्या संख्येने वाढणारे कोरोनाचे रुग्ण आता काही शेकड्यांत सापडत आहे. राज्यातील कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही न्यून झाले आहे, असे असतांना नायर रुग्णालयात कोरोनाच्या ‘आर.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल देण्यासाठी ३ दिवस लागत आहेत. अहवाल येण्यास विलंब होत असल्याविषयी रुग्णांना कळवलेही जात नाही, तसेच ‘अहवाल आला आहे का ?’ हे विचारण्यासाठी तेथे संपर्क क्रमांकही देण्यात आलेला नाही. त्यामुळे कोरोनाचा अहवाल घेण्यासाठी रुग्णांना हेलपाटे घालावे लागत आहेत. ‘२४ घंट्यांत कोरोनाचा अहवाल’ असे शासनाचे धोरण आहे; मात्र त्याला शासकीय रुग्णालयांकडूनच हरताळ फासला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये कोरोनाच्या ‘ॲन्टीजेन’ चाचणीचा अहवाल १५-२० मिनिटांत मिळतो. येथे कोरोनाच्या चाचणीची सुविधा आणि वैद्यकीय कर्मचार्यांचा प्रतिसादही चांगला आहे; मात्र कोरोनाच्या ‘आर.टी.पी.सी.आर्.’ चाचणीच्या अहवालाला होणार्या विलंबामुळे रुग्णांच्या जीविताला धोका संभवू शकतो. नायर रुग्णालयात ज्या खिडकीवर कोरोनाचा अहवाल मिळतो, त्याठिकाणी ‘अहवाल झाला आहे का ?’ याची विचारणा करण्यासाठी संपर्क क्रमांकही ठेवण्यात आलेला नाही, तसेच रुग्णाच्या भ्रमणभाषवरही अहवाल कळवला जात नाही. याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. कोरोनाची चाचणी केलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्यास आणि अहवाल प्राप्त होण्यास विलंब झाल्यास त्या काळात एखाद्या रुग्णाचा सार्वजनिक ठिकाणी वावर झाल्यास यातून कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याचाही धोका आहे.
प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे, तसचे रुग्णांकडे ‘स्मार्टफोन’ नसल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून स्पष्टीकरण !
‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल देण्यास होत असलेल्या विलंबाविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भरमल यांनी अहवालांची चाचणी करण्यासाठी पुरेशा प्रयोगशाळा उपलब्ध आहेत; मात्र ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे अहवाल देण्यास विलंब होत असल्याचे सांगितले. वेळेत अहवाल न झाल्यामुळे रुग्णांना अहवाल घेण्यासाठी पुन्हा यावे लागते, तसेच त्याविषयी कळवले जात नाही. याविषयी डॉ. भरमल म्हणाले की, अनेक रुग्ण गरीब आहेत. त्यांच्याकडे ‘स्मार्टफोन’ नाही किंवा भ्रमणभाष अन्य कुणाच्या तरी नावावर असतो. या सर्व प्राथमिक गोष्टी आहेत. कोरोनाच्या कालावधीत या गोष्टींकडे लक्ष देता आले नाही; मात्र याविषयीच्या सूचना आम्ही लक्षात घेतो. (रुग्णांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा द्यायला हव्यात, हे संबंधित अधिकार्यांच्या लक्षात न येणे, हे गंभीर आहे. याकडे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रुग्णांची असुविधा होणार नाही, हे पहावे, तसेच यामध्ये हलगर्जीपणा करणार्यांवर कारवाई करावी. – संपादक)