नवरात्रीत विशेष भावसत्संग ऐकतांना आलेल्या अनुभूती
१. नवरात्रीतील विशेष भावसत्संगात आरंभीचे ३ दिवस ध्यान लागणे आणि जे घडत होते, ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मुखातून ऐकू येणे
‘नवरात्रीतील भावसत्संगात आरंभीचे ३ दिवस श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी प्रार्थना केल्यावर मी एका वेगळ्याच विश्वात गेले. माझे देहभान हरपून ध्यान लागले. त्या वेळी माझ्यासमोर जे सर्व घडत होते, ते सर्व श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या मुखातून ऐकू येत होते, उदा. ‘आदिमाता प्रगट झाली’, असे मला दिसले आणि त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई तसे म्हणाल्या. हा सत्संग एक घंट्यापेक्षा अधिक असतांनाही मला तो ‘५ – १० मिनिटेच होता’, असे वाटायचे. सत्संगाची सांगता होत असतांना मला जाग यायची.
२. सत्संगाच्या अखेरीस ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आश्रमातील श्री भवानीदेवीच्या भेटीस येऊन पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेत आहेत’, असे दृश्य मला दिसायचे.
३. भावसत्संगाचे शेवटचे ३ दिवस असह्य त्रास होणे
सत्संगातील घंटानाद ऐकतांना माझे शरीर कंप पावत असे. शेवटचे ३ दिवस मला त्रास असह्य झाला. सत्संग ऐकायला बसल्यावर पायाच्या तळव्यांना पुष्कळ खाज येऊ लागली आणि मन एकाग्र करणे कठीण झाले.
४. सत्संग ऐकतांना आदिमाता प्रगट होणे, तिला हिंदूंच्या सर्व समस्या सांगणे आणि हिंदु राष्ट्रासाठी आश्वस्त करून ती अदृश्य झाल्यावर सत्संग संपल्याची जाणीव होणे
एके दिवशी सत्संग ऐकतांना आदिमाता प्रगट झाल्यावर मला ‘सत्संग चालू आहे’, याचे भान राहिले नाही. मी तिला हिंदूंच्या सर्व समस्या सांगितल्या. मी तिच्याशी बोलले आणि तिने मला प्रेमाने कवटाळले. शेवटी तिने मला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात आश्वस्त केले. ती अदृश्य झाल्यावर मला सत्संग संपल्याची जाणीव झाली. त्या वेळी ‘सत्संगात काय झाले ?’, हे मला कळलेच नाही.
५. रात्री नामजप करत असतांना भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे बोल आठवू लागणे आणि डोळे मिटल्यावर आदिमातेच्या सर्व रूपांचे दर्शन होणे
आठव्या दिवशी रात्री नामजप करत असतांना मला भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे बोल आठवून ‘जणू त्याच बोलत आहेत’, असा आवाज ऐकू येऊ लागला. त्या वेळी मी डोळे मिटल्यावर मला आदिमातेच्या सर्व रूपांचे दर्शन झाले. ही रूपे एवढी स्पष्ट दिसत होती की, मी माझ्या डोळ्यांची उघडझाप करून पुनःपुन्हा पहात होते. अशी अनुभूती मला आदिमातेने प्रथमच दिली.
‘हे आदिमाते, तुझ्या कृपेने मला हे सर्व तू अनुभवायला दिलेस. तुझे दर्शन देऊन आम्हा सर्वांना शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक बळ दिलेस. त्यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (३०.१०.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |