संभाजीनगर येथील जिल्हा प्रशासन पुढील आठवड्यात लेबर कॉलनीवर बुलडोझर चालवणार !

दप्तर सिद्ध करणे चालू !

विश्वासनगर लेबर वसाहत

संभाजीनगर – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या विश्वासनगर लेबर वसाहतीवर पुढील आठवड्यात बुलडोझर चालवण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ‘जिल्हाधिकारी २ दिवस रजेवर आहेत, तर रविवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे १५ किंवा १६ नोव्हेंबर या दिवशी घरे पाडणे चालू होईल’, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे येथील रहिवाशांनीही शेवटच्या क्षणापर्यंत घर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शेवटच्या क्षणापर्यंत लेबर कॉलनीतील घरे सोडायची नाहीत’, या मतावर रहिवासी ठाम आहेत. रहिवाशांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालूच आहे. न्यायालयानेही प्रशासनाला नोटीस दिलेली असल्याने रहिवाशांचे न्यायालयाच्या निर्णयाकडेही लक्ष आहे.

१. लेबर कॉलनी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमीवर असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. येथे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सेवा निवासस्थाने बांधली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ८ दिवसांत निवासस्थान खाली करण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने ती कर्मचार्‍यांना वाटप केली होती; मात्र कर्मचार्‍यांनी निवृत्तीनंतरही निवासस्थाने सोडली नाहीत.

२. गेल्या ४० वर्षांपासून सरकारी भूमीवर ही अतिक्रमणे आहेत, तसेच इमारती ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असल्याने केव्हाही पडू शकतात, असे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’मध्ये समोर आले आहे.

३. हीच संधी मानून प्रशासनाने सर्व घरे भूईसपाट करून भूमी कह्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. जिल्हा प्रशासनाने मूळ रहिवाशांकडून ‘अलॉटमेंट लेटर’ आणि संबंधित कागदपत्रे जमा केली आहेत. येत्या २ दिवसांत १८२ जणांनी कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांवरून जिल्हा प्रशासन मूळ रहिवाशांचे दप्तर (रेकॉर्ड) सिद्ध करून ठेवणार आहे.