कार्तिक मासातील (१४.११.२०२१ ते २०.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘५.११.२०२१ दिवसापासून कार्तिक मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २०.११.२०२१ या दिवसापासून कार्तिक कृष्ण पक्ष चालू होणार आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी, विष्णु प्रबोधोत्सव : कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला ‘प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी’ म्हणतात. या दिवशी ‘विष्णु प्रबोधोत्सव’ साजरा करतात; कारण आषाढ शुक्ल एकादशीपासून योगनिद्रेत असलेला भगवान श्रीविष्णु कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला योगनिद्रेतून जागा होतो. या दिवशी भगवान विष्णूच्या ‘दामोदर’ रूपाची पूजा करतात. या दिवशी श्रीविष्णुसहस्रनाम वाचावे. सूर्याेदयाला जी एकादशी तिथी असते, तिला ‘स्मार्त एकादशी’ म्हणतात. स्मृतींना पाळणारे स्मार्त एकादशी पाळतात. १४.११.२०२१ या दिवशी स्मार्त एकादशी आहे.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १५.११.२०२१ या दिवशी सकाळी ६.४० पासून सायंकाळी ६.०९ पर्यंत आणि १६.११.२०२१ या रात्री ८.१४ पासून १७.११.२०२१ सकाळी ९.५१ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १४.११.२०२१ या दिवशी रविवार असून उत्तररात्री ६.४० पासून द्वादशी तिथीला आरंभ होत असल्याने तेव्हापासून १५.११.२०२१ या दिवशी सूर्याेदयापर्यंत दग्धयोग आहे. (टीप १)
२ ई. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. १४.११.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.१० पासून उत्तररात्री ६.४० पर्यंत आणि १८.११.२०२१ या दिवशी दुपारी १२.०१ पासून उत्तररात्री १.१२ पर्यंत विष्टी करण आहे.
२ उ. भागवत एकादशी : कधी कधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा सलग दोन एकादशी तिथी येतात. भागवत धर्म पाळणारे वारकरी भागवत एकादशी पाळतात. स्मार्त आणि भागवत या दोन एकादशी दोन स्वतंत्र दिवशी येतात. प्रत्येक मासाच्या प्रत्येक पक्षात अशा दोन एकादशी येतीलच, असे नाही. १५.११.२०२१ या दिवशी भागवत एकादशी आहे.
२ ऊ. चातुर्मास्य समाप्ती : आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला चालू झालेल्या चातुर्मासाची समाप्ती कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला होते. या दिवशी चातुर्मासात केलेल्या व्रतांची समाप्ती करतात.
२ ए. तुलसी विवाहारंभ : कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुलसी विवाह साजरा केला जातो. भगवान श्रीविष्णूचा तुलसीशी विवाह झाल्यावर घरामध्ये विवाहकार्य करण्याची पद्धत आहे. १५.११.२०२१ या दिवशी तुलसी विवाहारंभ आहे.
२ ऐ. पंढरपूर यात्रा : कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पंढरपूर येथे यात्रा असते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. आषाढ आणि कार्तिक एकादशीला अनेक भक्तजन पंढरपूरला दर्शनासाठी येतात. १५.११.२०२१ या दिवशी पंढरपूर यात्रा आहे.
२ ओ. मन्वादि : कार्तिक शुक्ल एकादशी तिथीला ‘मन्वादियोग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १५.११.२०२१ या दिवशी मन्वादियोग आहे.
२ औ. महालय समाप्ती : भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या १५ दिवसांच्या कालावधीला ‘पितृपक्ष’ किंवा ‘पितृपंधरवडा’ म्हणतात. पितृपक्षात महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सूर्य तूळ राशीत असेपर्यंत कोणत्याही तिथीला महालय श्राद्ध करता येते. १५.११.२०२१ या दिवशी महालय समाप्ती आहे.
२ अं. शाक-गोपद्मव्रत समाप्ती : आषाढ शुक्ल पक्ष द्वादशीपासून कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपर्यंत चार मास प्रतिदिन हे व्रत करतात. या व्रतामध्ये पहाटे स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्मे काढून त्यांची पूजा करतात. १५.११.२०२१ या दिवशी शाक-गोपद्मव्रत समाप्ती आहे.
२ क. भौमप्रदोष : मंगळवारी येणार्या त्रयोदशी तिथीला ‘भौमप्रदोष’ म्हणतात. १६.११.२०२१ या दिवशी भौमप्रदोष आहे. आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी ‘भौमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ ख. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धियोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धियोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते.
१. मंगळवार, १६.११.२०२१ या रात्री ८.१४ पासून अश्विनी नक्षत्र असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत अमृतयोग आहे; परंतु मंगळवारी अश्विनी नक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धियोग होतो, तो गृहप्रवेशास वर्ज्य करावा.
२. शनिवार, २०.११.२०२१ या दिवशी अहोरात्र रोहिणी नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे; परंतु शनिवारी रोहिणी नक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धियोग होतो, तो प्रयाणास वर्ज्य करावा.
२ ग. वैकुंठचतुर्दशीचा उपवास : कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठचतुर्दशीचा उपवास करतात. या दिवशी निशीथकाळात (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीला आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयकाळी शिवपूजन करतात. १७.११.२०२१ या दिवशी सकाळी ९.५१ पासून १८.११.२०२१ या दिवशी दुपारी १२.०१ पर्यंत कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी आहे.
२ घ. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. बुधवार, १७.११.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून रात्री १०.४३ पर्यंत अश्विनी नक्षत्र असल्याने मृत्यूयोग आहे.
२ च. वैकुंठचतुर्दशी : कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशीनिमित्त शिव आणि श्री विष्णुदेवता यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. या दिवशी आवळी पूजन आणि भोजन करावे. निशीथकाळात (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीला श्री विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयकाळी शिवपूजन करावे. १७.११.२०२१ या दिवशी वैकुंठचतुर्दशी आहे.
२ छ. त्रिपुरारि पौर्णिमा : या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला ‘त्रिपुरारि पौर्णिमा’, असे म्हणतात. ही तिथी प्रदोषव्यापिनी पाहिजे. या दिवशी सायंकाळी त्रिपुरवाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
२ ज. कार्तिकस्वामी दर्शन : कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असतांना श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले आहे. गुरुवार, १८.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.२९ पासून १९.११.२०२१ या दिवशी दुपारी २.२८ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग असल्याने या वेळेत श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे. श्री कार्तिकस्वामींचे वाहन मयूर (मोर) आहे. त्याची पूजा करावी. या दिवशी स्नान करून श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप आणि दीप अर्पण करावा. श्री कार्तिकेय स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राला ‘प्रज्ञावर्धन स्तोत्र’ असेही म्हणतात. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक क्षमता वाढते.
२ झ. यमघंटयोग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. गुरुवारी १८.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.२९ नंतर कृत्तिका नक्षत्र असल्याने या दिवशी सूर्याेदयापर्यंत यमघंटयोग आहे.
२ ट. कार्तिकस्नान समाप्ती : सूर्याेदयकाली असलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकस्नान समाप्ती होते. १९.११.२०२१ या दिवशी सूर्याेदयकाली कार्तिक पौर्णिमा आहे.
२ ठ. गुरुनानक जयंती : कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाते. शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केली. हा दिवस शीख धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १९.११.२०२१ या दिवशी गुरुनानक जयंती आहे.
२ ड. तुलसी विवाह समाप्ती : कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी भगवान विष्णूचा तुलसीशी विवाह साजरा करून मंगलकार्ये चालू होतात. १९.११.२०२१ या दिवशी तुलसी विवाह समाप्ती आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१०.२०२१)