ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !
जर्मनीमध्येही रुग्णसंख्येत प्रचंड वाढ
लंडन – कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने भीती निर्माण केली आहे. फ्रान्समध्ये सलग २ दिवस १० सहस्रांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. जर्मनीतही कोरोना पुन्हा एकदा बळावला असून गेल्या २४ घंट्यांत ५० सहस्र नवे रुग्ण आढळले आहेत.
“Several neighboring countries are already in a fifth wave of the #Covid19 epidemic, what we are experiencing in France clearly looks like the beginning of a fifth wave.”https://t.co/zr0vo930LC
— Economic Times (@EconomicTimes) November 11, 2021
१. फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी कोरोनासंबंधी चेतावणी देतांना ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना उपाहारगृहांमध्ये जाण्याआधी, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी, तसेच रेल्वेमधून प्रवास करण्याआधी कोरोना प्रतिबंधात्मक ‘बूस्टर डोस’चे (‘लसीच्या तिसर्या डोस’चे) प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे, असे स्पष्ट केले आहे. १५ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.
२. ब्रिटनने जून २०२१ मध्ये कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले होते. तेव्हापासूनच तेथे कोरोना संसर्गाची चौथी लाट चालू झाली होती. ऑक्टोबरपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ब्रिटनमध्ये ५१ सहस्र ४८४ रुग्ण आढळले होते. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
३. जर्मनीमध्ये ११ नोव्हेंबर या दिवशी सर्वाधिक ५० सहस्र १९६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जर्मनीतील विषाणूशास्त्रज्ञ क्रिस्टियन ड्रॉस्टेन यांनी येत्या काही दिवसांत १ लाख मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.