नाशिक येथील ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित प्रभाकर दसककर यांचे निधन
नाशिक – येथील ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर (वय ९४ वर्षे) यांचे रहात्या घरी १० नोव्हेंबर या दिवशी सायं. ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात् ४ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे, असा परिवार आहे. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर यांचे ते वडील होत. पंडित प्रभाकर दसककर यांच्यावर ११ नोव्हेंबर या दिवशी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नाशिक येथील संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी आवर्जून पंडित दसककर यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होती. सनातन परिवार आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय दसककर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
नाशिक येथील ज्येष्ठ संगीत शिक्षक, तसेच वादक म्हणून पंडित प्रभाकर दसककर यांची ख्याती होती. त्यांचे संगीताचे शिक्षण त्यांचे काका पंडित एकनाथ दसककर आणि ग्वालियर घराण्याचे पंडित राजाभैया पुंछवाले यांच्याकडे झाले होते. त्यांनी ‘ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळा’ची स्थापना करून अनेक महिलांना संगीताचे शिक्षण दिले. संपूर्ण हरिपाठ रागदारीतील वैविध्यपूर्ण रागांमध्ये संगीतबद्ध केला. त्यांनी अनेक शिष्य घडवले.
संगीत आणि अध्यात्म यांचा सुवर्णसंगम म्हणजे संवादिनीवादक पंडित प्रभाकर दसककर !
ऑक्टोबर २०१९ मध्ये संगीताचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास करण्याच्या दृष्टीने आम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून नाशिक येथे गेलो होतो. त्या वेळी पंडित प्रभाकर दसककर यांच्या भेटीचा योग आला. पं. दसककर ज्यांना प्रेमाने सगळे ‘दादा’ म्हणत. त्यांच्या सहवासात आम्हाला पुष्कळ शिकता आले. ‘पंडित प्रभाकर दसककर यांच्या निधनाने संगीत आध्यात्मिक स्तरावर जगणार्या एका ज्येष्ठ मार्गदर्शकांना आम्ही पारखे झालो’, अशी भावना दाटून आली. पंडित प्रभाकर दसककर यांच्या चरणी हे श्रद्धांजलीपुष्प समर्पित करते.
१. वयोमानामुळे अंथरूणाला खिळून असतांनाही संगीत साधना करणार्या साधकांना आनंदाने भेटून मार्गदर्शन करणे
दादांचे वय त्या वेळी ९२ वर्षे होते. वयोमानामुळे ते अंथरूणाला खिळूनच होते. असे असतांनाही ‘संगीताच्या माध्यमातून साधना करणारे साधक आले आहेत’, हे कळल्यावर दादांना पुष्कळ आनंद झाला. त्यांना कॅथेटर (लघवी करण्याची पिशवी) लावले होते. अशा स्थितीतही त्यांनी त्यांचा मुलगा पंडित सुभाष दसककर यांना पेटी (हार्मोनियम) काढायला लावली. त्यांनी आमच्यासाठी काही भजने स्वतः गात पेटीवर वाजवली. या वेळी त्यांनी एकट्यानेच नाही, तर त्यांच्या मागे मलाही भजने म्हणण्यास शिकवले.
२. ‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो’, याचा आदर्श असलेले पंडित प्रभाकर दसककर !
पंडित प्रभाकर दसककर यांचा त्या वयातील उत्साह आणि त्यांच्या चेहर्यावरील दैवी आनंद पाहूनच दादांची आध्यात्मिक स्थिती पुष्कळ चांगली असल्याचे माझ्या लक्षात आले. दादांकडे पाहून ‘ते सतत भगवंताच्या अनुसंधानातच आहेत’, असे जाणवले. अध्यात्म आणि संगीत यांचा सुवर्ण संगम म्हणजे पंडित प्रभाकर दसककर ! दादांच्या मुखावर निरागस भाव, आनंद आणि प्रीती यांचा संगमच जाणवत असे. ‘संगीत हे साधनेच्या दृष्टीने जगल्याने आध्यात्मिक उन्नती करून संगीताच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो’, याचा आदर्शच त्यांनी नवोदित कलाकारांसमोर ठेवला आहे. दादांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या घराण्यात त्यांची मुले, नाती, नातसून या सगळ्यांवरच संगीताचे संस्कार करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संगीत साधनेचे धडे दिले आहेत.
‘संगीत हे अध्यात्माकडेच नेणारे आहे. संगीत आणि अध्यात्म यांमध्ये आत शिरलो की, त्यातून बाहेर पडणे कठीण असते’, असे संगीतसाधनेविषयीचे सुंदर विश्लेषण आमच्या भेटीत त्यांनी केले होते. ‘अध्यात्म आणि संगीत हे सर्वोच्च आनंद देत असल्याने तो आनंद सतत अनुभवत रहावा वाटतो’, असे दादांना म्हणायचे होते. ते स्वत: हे जीवन जगले आहेत.
३. सनातनच्या आश्रमातून दिलेल्या प्रसादाविषयी कृतज्ञताभाव जाणवणे
आम्ही पंडित प्रभाकर दसककर यांची भेट घेऊन निघतांना त्यांना सनातनच्या रामनाथी आश्रमातील प्रसाद दिला. तेव्हा ‘देवाने न मागताच प्रसाद दिला’, असे ते म्हणाले. त्यांच्या या वाक्यातून प्रसादाविषयीचा कृतज्ञतेचा भाव जाणवला. ‘या भेटीतून आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला’, असे दादा यांनी सांगितले. त्यांनी ‘तुमचा मार्ग चांगला सुलभ होवो’, असा आशीर्वाद आम्हाला दिला.
दादांसारख्या अत्यंत ज्येष्ठ आणि कर्मयोगी कलाकारांचा सहवास मिळाला अन् त्या माध्यमातून आम्हाला पुष्कळ शिकता आले, यासाठी मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
– कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद, ६३ टक्के आध्यात्मिक पातळी), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.