माडखोल धरणात युवक बुडाला : शोध घेण्यात अपयश
सावंतवाडी – तालुक्यातील माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला शहरातील खासकीलवाडा येथील अर्जुन विश्राम पाताडे (वय १८ वर्षे) हा युवक बुडाल्याची घटना १० नोव्हेंबर या दिवशी घडली. ११ नोव्हेंबरला पोलिसांनी अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
अर्जुन आणि त्याचे मित्र तेजस राऊळ अन् संकेत कामतेकर (दोघेही रहाणार सावंतवाडी) हे तिघे १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता माडखोल धरण परिसरात फिरायला गेले होते. दुपारी तिघेही अंघोळीसाठी धरणात उतरले. अर्जुनला पोहता येत नसल्याने थोड्या वेळाने तो दिसेनासा झाला. मित्रांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याची माहिती दिली आणि अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो न सापडल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अर्जुनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही तो न सापडल्याने ११ नोव्हेंबरला पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली; मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नाही.