भारत, अमेरिका यांच्यासह जगात पुरुषांमध्ये अविवाहित रहाण्याचा विचार होत आहे प्रबळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.

१. ‘अमेरिकन कम्युनिटी’कडून वर्ष २०१९ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, २५ ते ५४ वयोगटांतील ३८ टक्के पुरुष अविवाहित आहेत. त्यांना विवाह करायचा नाही. यांतील ४० ते ५४ वयोगटांतील २० टक्के पुरुष अविवाहित असण्यासह ते त्यांच्या आई-वडिलांसमवेत रहात आहेत. वर्ष १९९० मध्ये अमेरिकेमध्ये अविवाहित पुरुषांची संख्या २९ टक्के होती. गेल्या ३० वर्षांत विवाह न करणार्‍या महिलांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

२. वर्ष २०२० मध्ये भारतात झालेल्या अशाच प्रकारच्या एका सर्वेक्षणामध्ये २६ ते ४०  वयोगटांतील ४२ टक्के पुरुषांचे म्हणणे होते की, त्यांना विवाह करायचा नाही आणि मुलेही नको आहेत. महिलांची संख्याही तितकीच सांगण्यात आली होती.

३. तरुणांच्या या विचारसरणीमागे त्यांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अमेरिकेतील सर्वेक्षणातून समोर आले होते की, ज्यांच्याकडे महाविद्यालयीन पदवी नाही, जे लहानसहान नोकरी करतात आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, ते विवाह करत नाहीत. ज्यांना चांगली नोकरी आणि चांगले उत्पन्न आहे, तेच तरुण अमेरिकेमध्ये विवाह करतात.

४. भारतातही सध्या अशीच स्थिती आहे. भारतात प्रतिमहा १० सहस्र रुपये कमावणारे ३९ टक्के तरुण विवाह करू इच्छित नाहीत. ज्यांचे उत्पन्न प्रतिमहा ६० सहस्र रुपये आहे, त्यांतीलही २१ टक्के युवक विवाह करू इच्छित नाहीत. अल्प उत्पन्नतेमुळे विवाह न करणार्‍या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा अधिक आहे.

५. काही वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणामध्ये ५० टक्के लोकांनी मान्य केले होते की, त्यांचे प्राधान्य विवाह करणे आणि मुले जन्माला घालणे, हे नाही. त्यापेक्षा स्वतःची नोकरी आणि व्यवसाय यांकडे लक्ष देऊ इच्छित आहेत. ४६ टक्के लोकांनी विवाह आवश्यक असल्याचे सांगितले, तर ४ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

६. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात होणार्‍या एकूण आत्महत्यांपैकी ४० टक्के आत्महत्या नात्यांमुळे होतात. २९ टक्के लोक कौटुंबिक समस्यांमुळे, तर ५ टक्के लोक विवाहामुळे सुखी नसल्याने आत्महत्या करतात. प्रेमसंबंधांमुळे आत्महत्या करणार्‍यांची संख्या साडेतीन टक्के आहे.

७. यातून लक्षात येते की, तरुणांचे विवाहाकडे आकर्षण अल्प असण्यामागे प्रामुख्याने कौटुंबिक दायित्वाची चिंता, आवश्यक पैसे कमवत नसल्याचा न्यूनगंड आणि प्रेमामध्ये अपयश, या ३ गोष्टी  आहेत. या कारणांमुळे विवाहाविषयी तरुणांचा मोहभंग होत आहे.